पारनेर | प्रतिनिधी,
पारनेर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेला भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज दादा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात युवकांना पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले.
मेळाव्यात बोलताना कृष्णराज महाडिक यांनी, “युवाशक्ती हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद असून पक्षाच्या विचारसरणीबरोबरच शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी युवा मोर्चावर आहे,” असे सांगितले. समाजकारण आणि राष्ट्रकार्यात युवकांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी पारनेर तालुक्यातील युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासावर विशेष भर देण्याची गरज व्यक्त केली. युवा मोर्चाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.
मेळाव्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याबाबत तसेच तालुक्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी संघटनात्मक निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरला.
कार्यक्रमादरम्यान निलेश शेळके आणि राहुल नरड यांची युवा मोर्चा मंडल उपाध्यक्षपदी, तर मंगेश खोसे यांची युवा मोर्चा मंडल चिटणीसपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. नियुक्तीपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विश्वनाथ दादा कोरडे, सुभाषराव दुधाडे, अश्विनीताई थोरात, राहुल शिंदे पाटील, सचिन वायकर, नितीनराव अडसूळ, युवराज पठारे, दत्ता नाना पवार, पंकज कारखिले, कल्याण थोरात, लहू भालेकर, सोनाली आंबेकर, अतुल माने, अर्जुनराव नवले, जयदीप सालके पाटील, संग्राम पावडे, कानिफनाथ ठुबे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



