Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरखासदार लंके यांच्या शिष्टाईनंतर वडगाव सावताळच्या बसचा मुहूर्त ठरला! राजदेवांच्या आंदोलनाला यश

खासदार लंके यांच्या शिष्टाईनंतर वडगाव सावताळच्या बसचा मुहूर्त ठरला! राजदेवांच्या आंदोलनाला यश


१९ ऑक्टोबरपासून खामकर झापमार्गे एसटी धावणार

पारनेर आगार व्यवस्थापकांचे लेखी आश्वासन, राजदेवांचे आंदोलन मागे

पारनेर : प्रतिनिधी, 

             खामकर झापमार्गे वडगाव सावताळ येथे एसटी बस सुरू करण्याची मागणी पूर्ण होऊनही प्रत्यक्ष बससेवा सुरू होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र राजदेव यांनी पारनेर एसटी आगाराच्या प्रशासकीय कार्यालयात सुरू केलेल्या बैठे आंदोलनाला अखेर यश आले आहे. खासदार नीलेश लंके यांनी या प्रश्नात मध्यस्थी करत शिष्टाई केल्यानंतर पारनेर आगार व्यवस्थापनाने १९ ऑक्टोबर २०२६ पासून पारनेर-वडगाव सावताळ (खामकर झापमार्गे) बस नियमितपणे सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

            खामकर झापमार्गे वडगाव सावताळ येथे एसटी बस सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली होती. शालेय विद्यार्थ्यांची यादीही आगाराला प्राप्त झाली होती. असे असतानाही प्रत्यक्ष बस गावात पोहोचत नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या प्रश्नासाठी रवींद्र राजदेव यांनी यापूर्वीही पाठपुरावा केला होता. मात्र, आश्वासनानंतरही बससेवा सुरू न झाल्याने या प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करत राजदेव यांनी नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष युवराज खिलारी यांच्यासह पारनेर आगाराच्या प्रशासकीय कार्यालयात बैठे आंदोलन सुरू केले. मोहन रोकडे व इतर सहकारी यावेळी उपस्थित होते.

               या आंदोलनामुळे बससेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी होणारी गैरसोय आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. खासदार नीलेश लंके यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत आगार व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यांच्या शिष्टाईनंतर बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आणि आगार व्यवस्थापकांनी अधिकृत पत्राद्वारे तारीख निश्चित केली.

        महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पारनेर आगार व्यवस्थापक कार्यालयाने १४ ऑक्टोब रोजी जारी केलेल्या पत्रात, मौजे वडगाव सावताळ येथे खामकर झापमार्गे नियमित बससेवा १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रवींद्र राजदेव यांनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्याचे नमूद करत, मागणीला यश मिळाल्याचेही पत्रात म्हटले आहे. आगार व्यवस्थापक अ. म. कोतकर यांनी हे लेखी आश्वासन दिले आहे.


            ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच नागरिकांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना एसटी बसचा मोठा आधार असतो. बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे बससेवा सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थांसाठी दिलासादायक मानला जात आहे. मात्र, यापूर्वी प्रक्रिया पूर्ण होऊनही बस सुरू न झाल्याने उपस्थित झालेल्या प्रश्नांवर राजदेव यांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले.

लेखी आश्वासनात १९ ऑक्टोबरपासून बस सुरू करण्याची निश्चित तारीख देण्यात आल्याने आंदोलनाची प्रमुख मागणी मान्य झाली आहे. आता या आश्वासनानुसार प्रत्यक्ष बससेवा नियमित सुरू होते का, याकडे वडगाव सावताळ आणि खामकर झाप परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न होता पुन्हा ऐरणीवर…

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी नियमित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे होती. तसेच नागरिकांनाही बाजारपेठ, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा आधार मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे बससेवा बंद झाली असल्याच्या चर्चा संपूर्ण वडगाव सावताळ आणि टाकळी ढोकेश्वर गटात रंगल्या होत्या. राजकारण करण्यासाठी इतर इतरही कारण असतात मात्र, बस सुरू करण्याच्या श्रेयाच्या लालसेपोटी शालेय विद्यार्थी आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणारी बससेवा पारनेर आगारातून तांत्रिक अडथळ्याचे कारण सांगून बस सुरू करण्याच्या तारखेत विलंब करून रविंद्र राजदेव यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला केला. त्यामुळे बस बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार होती. मात्र खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने ही बस सेवा १९ तारखेपासून वडगाव सावताळ करांच्या सेवेत रुजू होणार असल्याने वडगाव सावताळ व खामकर झाप येथील ग्रामस्थांनी खासदार निलेश लंके आणि टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव यांचे आभार मानले आहेत. 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments