छत्रपती संकुलाच्या वतीने सन्मान; आमदार काशिनाथ दाते यांची उपस्थिती
पारनेर/प्रतिनिधी :
कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कास्यपदक विजेता पैलवान चेतन रेपाळे यांचा नागरी सत्कार सोहळा नगरसेवक पैलवान युवराज पठारे यांच्या वतीने पारनेर येथील छत्रपती कुस्ती संकुल येथे सोमवार, ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही मल्लांचा गौरव करण्यात आला. यावेळी छत्रपती संकुलात सराव करणाऱ्या अनेक बाल मल्लांनी आपल्या लाडक्या पैलवानांचे जल्लोषात स्वागत केले.
आमदार काशिनाथ दाते यांनी विजेत्या दोन्ही मल्लांना शुभेच्छा दिल्या. आमदार काशिनाथ दाते यावेळी म्हणाले की पैलवान हर्षवर्धन सदगीर हा सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे. त्याने महाराष्ट्र केसरी किताब मिळवत नाव उज्वल केले आहे त्याने महाराष्ट्र शासनाकडे शासकीय नोकरी विषयी खंत व्यक्त केली आहे यापुढील काळात महाराष्ट्र केसरी होणाऱ्या प्रत्येक कुस्तीपटूला महाराष्ट्र शासनाकडून वरिष्ठ दर्जाची शासकीय नोकरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे विषय मांडून पाठपुरावा करणार आहे.
या सत्कार सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पैलवानांच्या पुढील वाटचालीस बळ मिळावे म्हणून त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. नगरसेवक पैलवान युवराज पठारे यांनी क्रीडा क्षेत्राप्रती आपली बांधिलकी जपताना हर्षवर्धन सदगीर यांना १ लाख ११ हजार रुपये आणि पैलवान चेतन रेपाळे यांना ५१ हजार रुपयांचे भरीव बक्षीस जाहीर केले. तसेच आमदार काशिनाथ दाते यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सदगीर यांना २५ हजार व रेपाळे यांना ११ हजार रुपयांची मदत घोषित केली. याशिवाय खडकवाडी गावच्या कुस्ती शौकिनांच्या वतीनेही दोन्ही पैलवानांना ११ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
नगरसेवक पै. युवराज पठारे यांचा भाचा असलेला पै. चेतन रेपाळे यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवत तिसरा क्रमांक मिळविला त्यांचे सुद्धा विविध स्तरातून कौतुक होत आहे. भविष्याचा महाराष्ट्र केसरी म्हणून पै. चेतन रेपाळेकडे पाहिले जात आहे त्या दृष्टीने चेतन हा कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून निश्चितच पारनेर तालुक्याला पै. चेतन रेपाळेच्या रूपाने पहिला महाराष्ट्र केसरी मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा पारनेरकर ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, डॉ. बाळासाहेब कावरे, माजी जि. प. सदस्य वसंत चेडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जेष्ठ नेते बाळासाहेब पठारे, कुंडलिक पठारे, दत्तानाना पवार, नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक भूषण शेलार, नगरसेवक अशोक चेडे, नगरसेवक नवनाथ सोबले, सरपंच लहू भालेकर, सुभाष दुधाडे, ॲड. बाबासाहेब खिलारी, प्रसाद कर्णावट, विकास रोकडे, अमोल रोकडे, निवृत्ती वरखडे, पांडुरंग खोडदे, कांतीलाल ठाणगे, शैलेंद्र औटी, सतीश म्हस्के, विशाल नगरे, आधी यावेळी उपस्थित होते छत्रपती संकुला मधील अनेक प्रशिक्षण घेत असलेले मल्ल उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेरचा भूमिपुत्र असलेला पै. चेतन रेपाळे हा गेल्या एक ते दीड वर्षापासून पुणे येथे माझ्यासोबत कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. यावर्षीच्या झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांने कास्यपदक मिळवले आहे. वय कमी असल्यामुळे चेतन भविष्यात नक्कीच चांगली तयारी करून महाराष्ट्र केसरी किताब मिळविले यात शंका नाही. नक्कीच तो महाराष्ट्र केसरीचा किताब भविष्यात खेचून आणेल त्याला सर्व सहकार्य आम्ही करू
– पै हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी)
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्रामीण भागातील मुलांनी कुस्तीमध्ये नाव कमवावे, यासाठी अशा दिग्गज पैलवानांचा आदर्श समोर असणे गरजेचे आहे. या सत्कारामुळे छत्रपती संकुलात सराव करणाऱ्या शेकडो तरुण मल्लांना नवी ऊर्जा मिळाली आहे.
– नगरसेवक पै युवराज पठारे (छत्रपती कुस्ती संकुल, पारनेर)



