पारनेर / ता. प्रतिनिधी,
शनिवार दि. ३१ आक्टो. २०२६ पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नांना मोठे यश आले आहे. नाबार्ड-३२ अंतर्गत तालुक्यातील तीन महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या पुलांसह डांबरीकरण व सुधारणा कामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये ढवळपुरी-सुतारवाडी, लालूचा तांडा ते ठाकरवाडी (ग्रामीण मार्ग क्र. ३८) या रस्त्याचे पुलासह डांबरीकरण करण्यासाठी रु. ३ कोटी, पारनेर ते लोणीहवेली रस्त्यावरील सा.क्र. २/८०० येथे लहान पुलाचे बांधकाम व जोडरस्त्याची सुधारणा करण्यासाठी रु. ५ कोटी तर पळशी ते गाड्याचा झाप (ग्रामीण मार्ग क्र. १७) या रस्त्याचे मोरीपुलासह डांबरीकरण करण्यासाठी रु. २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ दळणवळणाचे साधन नसून शेती, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला जोडणारी जीवनवाहिनी आहेत. हीच गरज ओळखून आमदार काशिनाथ दाते सर यांनी या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या निधीतून तालुक्यातील रस्ते विकासाला नवी गती मिळणार आहे.
या निधीस मंजुरी मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी पारनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.
विकासकामांचा केवळ पाठपुरावा नव्हे, तर त्यांना प्रत्यक्ष मंजुरी मिळवून जनतेच्या गरजा पूर्ण करण्याची भूमिका आमदार दाते सरांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.



