Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपर्यावरण रक्षणातून समृद्धीकडे! रेनवडी शाळेचा 'एक विद्यार्थी – एक फळझाड' उपक्रम यशस्वी

पर्यावरण रक्षणातून समृद्धीकडे! रेनवडी शाळेचा ‘एक विद्यार्थी – एक फळझाड’ उपक्रम यशस्वी


पारनेर/ भगवान गायकवाड, 
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून, अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या रेनवडी (ता. पारनेर) येथील जि. प. प्राथ.शाळेने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान’ अंतर्गत शाळा आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “एक विद्यार्थी – एक फळझाड” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर गावाच्या शाश्वत विकासाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे.

७५ विद्यार्थ्यांनी लावली ७५ ‘कल्पतरू’ झाडे या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या हाताने एक झाड लावून त्याचे पालकत्व स्वीकारले आहे. एकूण ७५ विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी ७५ नारळाच्या रोपांची लागवड केली. नारळाला ‘कल्पतरू’ मानले जाते; त्याप्रमाणेच ही झाडे भविष्यात शाळेसाठी आणि गावासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत ठरणार आहेत.हा उपक्रम केवळ फोटो काढण्यापुरता किंवा वृक्षारोपण दिनापुरता मर्यादित नाही. यामागे एक मोठा दूरदृष्टीपूर्ण विचार आहे. येत्या काही वर्षांत जेव्हा ही नारळाची झाडे मोठी होतील, तेव्हा त्यातून मिळणारे उत्पन्न शाळेच्या गरजा, शैक्षणिक साहित्याची पूर्तता आणि गावातील विकासकामांसाठी वापरले जाणार आहे. यामुळे शाळा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल.या उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती पारनेरचे विस्तार अधिकारी कैलास जगताप व बाळासाहेब मेहत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी रेनवडी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि जिल्हाभरात अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ पावडे सर आणि त्यांच्या कार्यतत्पर शिक्षकवृंदाने या उपक्रमाचे नेटके नियोजन केले होते. त्यांना शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीचे खंबीर पाठबळ लाभले.कार्यक्रमाला गावातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. सरपंच श्रीकांत शेठ डेरे, उपसरपंच सौ. कांचनताई येवले, माजी सरपंच. भीवसेन येवले, माजी उपसरपंच बाबासाहेब येवले, तंटामुक्ती उपाध्यक्ष शरद झिंजाड, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव भोर,संदीप गोसावी, ग्राम अधिकारी हरिश्चंद्र काळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती प्रेम तर निर्माण झालेच, पण त्यासोबतच ‘आपल्या हाताने लावलेले झाड गावाच्या कामात येणार’ या भावनेतून सामाजिक बांधिलकीची जाणीवही प्रगल्भ झाली आहे. रेनवडी ग्रामपंचायतीने घेतलेला हा पुढाकार आजूबाजूच्या अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments