Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर मध्ये होणार ‘महाआरोग्ययज्ञ’; खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याचा विराट महोत्सव

पारनेर मध्ये होणार ‘महाआरोग्ययज्ञ’; खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याचा विराट महोत्सव

शरद पवार यांच्या ६० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीला सलाम

दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली

पारनेर / भगवान गायकवाड, 

      पारनेर शहरात ८ व ९ मार्च रोजी आरोग्य सेवेचा अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाल्याचा टप्पा आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ‘महाआरोग्ययज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालय परिसरात होणाऱ्या या शिबिरात हजारो रुग्णांना मोफत निदान, उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार आहेत.

           खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

[ टाकळी ढोकेश्वर गट संपर्क : श्री रवींद्रशेठ राजदेव आणि सौ. सोनियाताई रवींद्र राजदेव. ]


🔶🔶🔶🔶🔶🔶
‘आरोग्य हेच खरे धन’ : सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय…

अर्जुन भालेकर म्हणाले, अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याला मोठा धक्का बसला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाढदिवस साजरा करताना समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांच्या सहा दशकांच्या संसदीय कारकिर्दीत संरक्षण, कृषी, सहकार आणि ग्रामीण विकास क्षेत्रात झालेल्या कार्याला मानवंदना देण्याचाही उद्देश या शिबिरामागे आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
राज्यातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती….

या शिबिरात राज्यातील विविध नामांकित रुग्णालयांतील एम.डी., एम.एस., डी.एन.बी. तज्ज्ञ डॉक्टर दोन दिवस पूर्णवेळ सेवा देणार आहेत. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, पाठीचे विकार, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, भगंदर, शरीरातील गाठी, त्वचारोग, दंतरोग, कान-नाक-घसा विकार यांसारख्या आजारांवर तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मावाटपही मोफत होणार आहे. १२ वर्षांपर्यंतच्या हृदयरोगग्रस्त बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध राहणार आहे.


🔶🔶🔶🔶🔶
आयुर्वेद, नॅचरोपॅथी आणि पुनर्वसन सेवा…

डॉ. बाळासाहेब कावरे यांनी सांगितले की, हे शिबिर केवळ अलोपॅथीपुरते मर्यादित नाही. आयुर्वेद, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी उपचारांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पॅरालिसिसग्रस्त रुग्णांचे पुनर्वसन, व्यायाम मार्गदर्शन व आहार सल्ला दिला जाईल. निदान झालेल्या रुग्णांवर पुढील सहा महिने सातत्याने उपचार व फॉलोअप केला जाईल. प्रतिष्ठानमार्फत त्यावर देखरेख ठेवली जाणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶😊
कोरोना काळातील कार्याची आठवण…..
 कारभारी पोटघन म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३३ हजार रुग्णांना मदत करण्यात आली. पायी जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी निवारागृह व अन्नछत्र सुरू करण्यात आले. डोळ्यांच्या शिबिरातून १२ हजार रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. त्याच परंपरेतून या व्यापक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
‘प्रत्येक कार्यकर्त्याने १० रुग्ण आणावेत’…..
खासदार नीलेश लंके म्हणाले, “धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्य तपासणीसाठी वेळ मिळत नाही. आरोग्य आणि शिक्षण हीच खरी गुंतवणूक आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्याऐवजी प्रत्येक कार्यकर्त्याने किमान १० रुग्ण शिबिरात आणावेत. हीच माझ्यासाठी खरी भेट असेल.”
दिवंगत अजित पवार यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.


🔶🔶🔶🔶🔶🔶
मान्यवरांची उपस्थिती…..
शिबिराचे उद्घाटन ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, दादाभाऊ कळमकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे, डॉ. प्रकाश लाळगे यांचे सहकार्य लाभणार आहे.

[ अधिक माहितीसाठी संपर्क: श्री.प्रकाश गाजरे ]


🔶🔶🔶🔶🔶🔶
भोजन व विश्रांतीची व्यवस्था….
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, विश्रांती व्यवस्था तसेच आवश्यक असल्यास पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरातील उपचारांची व लाभार्थ्यांची माहिती पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात यापूर्वी इतक्या व्यापक प्रमाणावर आरोग्य शिबिर झाले नसल्याचे सांगत आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments