Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरवडझिरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके

वडझिरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके



पारनेर / भगवान गायकवाड, 

रयत शिक्षण संस्थेच्या वडझिरे (ता. पारनेर) येथील श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके व आनंदीबाई नारायण एरंडे उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी, २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. ‘योग, आरोग्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी राऊत यांनी भूषविले. आपल्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक राऊत यांनी योगासनांच्या आणि प्राणायामाच्या प्राचीन वारशाचा गौरव केला. ते म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी योग हे एक प्रभावी माध्यम आहे. नियमित योगाभ्यास आणि व्यायामामुळे केवळ शरीरच नव्हे, तर मनही सुदृढ आणि तंदुरुस्त राहते. विद्यार्थ्यांनी योगाला केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न मानता, आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे.”

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रात्यक्षिक सत्रात विद्यालयातील शिक्षक संदिप शिंदे आणि प्रणव वाळुंज यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने करून दाखवली. यामध्ये सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम-विलोम अशा महत्त्वाच्या आसनांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्साहाने आणि अचूकतेने योगासनांचा सराव केला. 

या उपक्रमास विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने योग दिनाचा हा उपक्रम एक लोकचळवळ झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रमोद रोहोकले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या योग दिन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली. योगाचे शारीरिक व मानसिक महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे स्थानिक पातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments