पारनेर शहरात लवकरच आणखी ५ कोटींची विकासकामे सुरू होणार…
पाणीपुरवठा योजना, संविधान भवन, सौर ऊर्जा प्रकल्पासह शहराचा चेहरामोहरा बदलणार :- सुजित झावरे पाटील
पारनेर / प्रतिनिधी,
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पारनेर शहरात सुमारे १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच लवकरच आणखी ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असून, पारनेरची पाणीपुरवठा योजना, संविधान भवन, सौर ऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्त्वाकांक्षी विकासकामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लावली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुजित झावरे पाटील म्हणाले की, पारनेर शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला असून, शहराच्या विकासासाठी माजी आमदार कै.वसंतराव झावरे पाटील यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला जोडणाऱ्या वाड्या-वस्त्यांमधील सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, संविधान भवनाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच मंजूर झालेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचेही भूमिपूजन लवकरच करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पारनेर शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित रस्त्यांनाही लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे सांगताना त्यांनी “शिवसेना जे बोलते ते करून दाखवते” असेही ठामपणे नमूद केले. येत्या काळात पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पारनेर शहराला आधुनिक शहराचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सातत्याने काम करणार असल्याचे सांगत, शहर तसेच ग्रामीण भागातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा नियोजन आराखड्यातून ग्रामीण भागातील विकासकामांसाठीही मोठा निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सुजित झावरे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पारनेर तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात सर्वांनी एकत्रितपणे साथ दिल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पारनेर शहरासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्रामीण भागातील विकासासाठीही आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सुजित झावरे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत तसेच यापुढील काळात विकासकामे करणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या सुजित झावरे पाटील यांना भविष्यात तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, तालुकाप्रमुख अरुण ठाणगे, महिला आघाडी प्रमुख डॉ.कोमल भंडारी, उपजिल्हाप्रमुख प्रियांका खिलारी, आशा खोडदे, संगीता खोडदे, सुवर्णा खोडदे, स्वाती खोडदे, अनिता खोडदे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष खंडू भुकन, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, डॉ.बाळासाहेब कावरे, सुभाष शिंदे, विजय भास्कर औटी, बाळासाहेब नगरे, निलेश खोडदे, भीमा औटी, तुषार औटी, विलास सोबले, संदीप कपाळे, बाळासाहेब माळी, रवींद्र पाडळकर, सतीश पिंपरकर, स्वप्नील राहीन्ज, सुभाष वराळ, दत्तात्रय ठाणगे, भास्कर गव्हाणे, कोंडीभाऊ ठाणगे, पांडुरंग औटी, सोपान कावरे, संदीप औटी, सचिन औटी, अशोक डोंगरे, संजय गंधाडे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, संतोष कावरे, संतोष भुसारे, बाळासाहेब बुगे, सुनील कावरे, रामदास कावरे, रामदास वाळुंज, कुंडलिक कावरे, दगडू कावरे, विश्वनाथ थोरात, लक्ष्मण कावरे, सुनील कावरे, सावकार बुगे, रमेश व्यवहारे, लहू व्यवहारे, बापू बुगे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



