Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरसुजित पाटील झावरे यांच्या पुढाकाराने खतटंचाई प्रश्नावर तातडीची बैठक; उपलब्ध युरिया साठा...

सुजित पाटील झावरे यांच्या पुढाकाराने खतटंचाई प्रश्नावर तातडीची बैठक; उपलब्ध युरिया साठा शेतकऱ्यांसाठी खुला करण्याचे निर्देश



पारनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या खतटंचाईच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत शिवसेना नेते सुजित पाटील झावरे यांच्या पुढाकाराने आज तालुका कृषी अधिकारी श्री. घुले आणि तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांची संयुक्त बैठक पार पडली. नुकत्याच काल झालेल्या कांदा आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी खतांचा तुटवडा असल्याची व्यथा सुजित पाटील झावरे यांच्यासमोर मांडली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून या प्रश्नावर चर्चा घडवून आणली.

बैठकीत तालुक्यातील खत उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध असलेला युरियाचा साठा तातडीने वितरित करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी श्री. घुले यांनी खत विक्रेत्यांना दिले.

यावेळी खत विक्रेत्यांनीही आपल्या अडचणी मांडल्या. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खतपुरवठ्यावर परिणाम होत असून, नगर येथील मालधक्क्याचे काम सुरू असल्याने खते कोपरगावमार्गे आणावी लागत आहेत. त्यासाठीचा अतिरिक्त वाहतूक खर्चही विक्रेत्यांनाच सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या नियमानुसार बफर स्टॉक राखणे बंधनकारक असल्यामुळे दुकानात खत उपलब्ध दिसत असले तरी ते तात्काळ विक्रीसाठी देता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर सुजित पाटील झावरे यांनी शेतकरी आणि खत विक्रेते या दोन्ही घटकांच्या अडचणी समजून घेत समन्वयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना वेळेत खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी तसेच गैरसमज दूर करून वितरण प्रक्रिया सुरळीत करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीअंती उपलब्ध असलेला युरिया साठा तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणींवर केवळ चर्चा न करता त्यावर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी यावेळी सांगितले.

“शेतकऱ्यांना खतासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, हीच आमची भूमिका असून प्रशासनानेही त्यासाठी संवेदनशीलतेने काम करावे,” असे मत सुजित पाटील झावरे यांनी व्यक्त केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
*शेतकऱ्यांकडून स्वागत*
काल पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजारसमितीत झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्री.सुजित पाटील झावरे यांनी खतांच्या प्रश्नावर घेतलेल्या तत्पर भूमिका व त्यासाठीचा पुढाकार या मुळे तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाने सुजित पाटील झावरे यांचे स्वागत केले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments