पारनेर/भगवान गायकवाड,
बालकांचे हक्क, शिक्षण व स्वावलंबन सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेच्या ‘उडान प्रकल्पा’ अंतर्गत बालविवाह प्रतिबंध, मुलींचे पुनर्वसन व बाल सुरक्षा या क्षेत्रात सातत्याने कार्य सुरू आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीवर आधारित या प्रकल्पाने मागील पाच वर्षांत जिल्ह्यात प्रभावी कार्य उभं केलं आहे. अधिकारी-शिक्षकांचे प्रशिक्षण, बालकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न, तसेच गावपातळीवर समित्यांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात ‘माझे गाव बालविवाहमुक्त गाव’ आणि ‘माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. गट विकास अधिकारी दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली, स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
बैठकीत या अभियानाच्या संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर बाल संरक्षण समित्या स्थापन करणे, शाळाबाह्य व अपठित मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे, सखी-सावित्री समित्या अधिक प्रभावी करणे, विवाह लावणाऱ्या पारंपरिक घटकांमध्ये जागृती निर्माण करणे, आणि स्थानिक यंत्रणांना सक्षम करून त्यांचा बालविवाह प्रतिबंधासाठीचा सहभाग वाढवणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.विशेषतः अशा कुटुंबांपर्यंत पोहोचून, जिथे बालविवाहाची शक्यता आहे, त्यांच्याशी समन्वय साधणे आणि प्रशासन व सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट मांडले गेले.
या वेळी प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट करत उपस्थित ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर गटविकास अधिकारी दया पवार यांनी पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बालविवाहमुक्त करण्याच्या अभियानाची अधिकृत घोषणा केली. “आपल्या तालुक्यातूनच जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा मार्ग निघणार आहे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या बैठकीत शशिकांत शिंदे तसेच पत्रकार भगवान गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीही या अभियानाच्या गरजेवर भर देत, प्रसारमाध्यमांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
हे अभियान स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडान प्रकल्पाच्या मा.संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर आणि संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, शशिकांत शिंदे, सीमा जुनी, योगेश अब्दुल्ले, प्रवीण दरंदले, शुभम डहारे, पूजा डाकुआ, निशा वाघ, मयूर ठोंबे हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
🔶🔶🔶🔶
अभियानांतर्गत राबवले जाणारे प्रमुख उपक्रम,बालविवाह प्रतिबंधक व्याख्याने,जनजागृतीसाठी पदयात्रा व सायकल यात्रा,पथनाट्य सादरीकरण,विद्यार्थी व युवकांचा सहभाग,शाळाबाह्य मुलींची सर्वेक्षण व त्यांना शिक्षणात जोडणे,कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती,महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून जागृती,पालक व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन,सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती,संकटग्रस्त बालकांसाठी हेल्पलाइनची निर्मिती या उपक्रमांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील प्रत्येक गाव बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला असून, या माध्यमातून जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचे मोठे पाऊल उचलले जाणार आहे. – प्रविण कदम, उडान प्रकल्प व्यवस्थापक, स्नेहालय.






