पारनेर / भगवान गायकवाड, 
  
     देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’अंतर्गत रविवारी पारनेर तालुक्यात सुपा, पारनेर, ढवळपुरी, भाळवणी, निघोज, आळकुटी,आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तालुक्यातील शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देऊन त्यांना आरोग्य सुरक्षा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

या मोहिमेचा भाग म्हणून पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क गावात आरोग्य पथकाने सक्रिय सहभाग नोंदविला. या गावातील लसीकरण मोहिमेची धुरा आशा सेविका उषा विजय गायकवाड आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस बायमा नसीर शेख यांनी सांभाळली. सकाळी निर्धारीत वेळेत पथकाने घरोघरी जाऊन आणि लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून बालकांना लसीकरण केले.

या मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन पालकांनी आपल्या लहान मुलांना लसीकरण केंद्रावर आणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “पोलिओवर विजय मिळविण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे,” असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मेहनतीमुळे पिंपळगाव तुर्क परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहोचून त्यांना पोलिओचे डोस देणे शक्य झाले.

तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे पारनेर तालुका पोलिओमुक्त राखण्यास मोठी मदत होणार असून, पालकांमध्येही आरोग्याबाबतची जागरूकता दिसून आली. आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *