पारनेर / ता. प्रतिनिधी 

सोमवार दि. २ मार्च २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द उपसा सिंचन योजना तसेच वनकुटे आणि पिंपळगाव रोठा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याची माहिती पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली. जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी सातत्याने आणि प्रभावीपणे केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सबंधित मांडवे खुर्द उपसा सिंचन योजना तसेच वनकुटे आणि पिंपळगाव रोठा उपसा सिंचन योजणांचे सविस्तर सर्वक्षण करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजे २८ लाख ५६ हजार ६६५ रुपयांच्या रकमेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारास काम निश्चित कालावधीत, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करूनच हा आदेश जारी करण्यात आला असल्याचेही आमदार दाते यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देणे ही केवळ घोषणा नसून आपली बांधिलकी आहे, असे ठामपणे सांगत आमदार दाते सरांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाला न्याय देण्याची आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली. शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, पाण्याअभावी होणारे नुकसान थांबवणे आणि ग्रामीण अर्थचक्राला बळकटी देणे हा या योजनांमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपसा सिंचन योजनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून उत्पादनवाढीस चालना मिळेल. ग्रामीण भागातील विकासकामे ही केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात पूर्णत्वास जावीत, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वासही आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *