दुष्काळाच्या सावटाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता

टाकळी ढोकेश्वर I प्रतिनिधी, 

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला श्रावणी बैलपोळा टाकळी ढोकेश्वर गटातसह नांदूर पठार येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आणि नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.

वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आणि शेतकऱ्याच्या संसाराचा अविभाज्य भाग असलेल्या बैलांची शेतकऱ्यांनी विधिवत पूजा केली. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढत पोळा सणाची परंपरा जपण्यात आली. मात्र यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे जाणवत होते.

सोयाबीन हे प्रमुख पीक असून त्यासोबत बाजरी, मूग, वाल आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून पैसे उभे केले आहेत. आता पाऊसच झाला नाही, तर घेतलेले पैसे कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

“जो बैल वर्षभर काबाडकष्ट करतो, त्याला आम्ही पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतो. त्यामुळे त्याचा सण आम्ही साजरा करणारच; मात्र निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्याचे पुढे काय होणार, याची चिंता आहे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन जनावरांच्या चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी तसेच परिसरात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्र राजदेव यांच्यासह शेतकरी सखाराम आग्रे, विठ्ठल आग्रे, प्रकाश राजदेव, नवनाथ पाटील घोलप, योगेश जाधव, नारायण राजदेव, नारायण चौधरी, अरुण आग्रे, गणेश देशमाने, भास्कर चौधरी, बाळू भांबरे, शंकर आग्रे, मुरलीधर उमप, गंगाधर आग्रे, आकाश महाराज घोलप, बाबाजी देशमाने, भानुदास आग्रे, सोपान राजदेव, पोपट राजदेव, अमोल गाडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : रविंद्र राजदेव…

“बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या भावनेशी जोडलेला सण आहे. शेतकरी आपल्या बैलाला पोटच्या मुलाप्रमाणे जपतो. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. या कठीण काळात मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकट परिस्थितीची पाहणी करून योग्य निर्णय घेतला नाही तर सर्व शेतकऱ्यांना घेऊन गुरा-ढोरासहित तहसील कार्यालयात आंदोलन करू.

— रविंद्र राजदेव
नेते, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *