पारनेर / भगवान गायकवाड,

       देशाच्या उज्वल भविष्यासाठी बालविवाह रोखणे ही काळाची गरज असून, समाजातील प्रत्येक घटकाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पारनेर तालुक्यातील संत निळोबाराय विद्यालय येथे स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्पांतर्गत बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराव पवार ( सर)होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उडान प्रकल्पाच्या समुपदेशक निशा वाघ, सोशल वर्कर व पत्रकार भगवान गायकवाड उपस्थित होते. तसेच वीरेंद्र पवार, महेश जाधव, शिक्षिका मंदा रासकर, कलाश्रुती वाळुंज, विजया गदादे, संजय सातपुते यांसह विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र पवार यांनी केले. मुख्य मार्गदर्शक निशा वाघ यांनी कुमारवयीन मुलींशी संवाद साधताना बालविवाहाचे गंभीर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम विषद केले. त्या म्हणाल्या की, “अल्पवयीन वयात विवाह लावल्याने मुलींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतातच, पण त्यांचे शिक्षणाचे आणि प्रगतीचे दरवाजेही कायमचे बंद होतात.”

उडान प्रकल्पाच्या कार्याविषयी माहिती देताना त्यांनी खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या, की बालविवाह पीडित मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची जबाबदारी प्रकल्प उचलतो तसेच बालकांचे हक्क आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांनुसार त्यांना संरक्षण मिळवून दिले जाते. बालविवाहाची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाते, जेणेकरून नागरिक निर्भयपणे तक्रार करू शकतील.अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करून संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा ‘उडान’चा मानस आहे.

समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी केवळ कायदे असून चालत नाही, तर सामाजिक जाणीव असणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरात कोठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ उडान हेल्पलाइन नंबर ९०११०२६४९५ वर संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहालय संस्थेचे पदाधिकारी हनिफ शेख ( सर), संचालक भाग्यश्री जरंडीकर मॅडम, आणि उडान प्रकल्प, व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्नेहालय टीमच्या वतीने मानण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांविषयी आणि कायद्यांविषयी मोठी जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *