पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवार दि.३ रोजी शहाजापूर येथील कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी वाचनालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेत, विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणा मिळेल अशा पुस्तकांचा संग्रह वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पारनेर येथील उप-अभियंता सुबोध वसईकर यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहुल सुरवशे, अभियंता प्रताप अंबुले, आणि सौरभ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
उप-अभियंता सुबोध वसईकर यांनी वाचनालयाच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी जागतिक स्तरावर गाजलेल्या आणि नामांकित व्यक्तींच्या जीवनावर आधारित पुस्तकांबद्दल माहिती दिली. “जगभर गाजलेली पुस्तके या ग्रंथालयात असलीच पाहिजेत. जेणेकरून शालेय विद्यार्थी आणि युवकांना यातून प्रेरणा मिळेल,” अशा सूचना वजा मार्गदर्शन त्यांनी केले.यावेळी वसईकर यांनी संशोधक आणि ‘टेस्ला’चे संस्थापक यांच्यासह काही नामांकित व्यक्तींच्या पुस्तकांची नावे आवर्जून सांगितली. त्यांनी या पुस्तकांचा समावेश वाचनालयात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे तरुण पिढीला त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची माहिती मिळेल.भेटीनंतर वसईकर यांनी आपल्या अभिप्रायात कौडेश्वर वाचनालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले आहे की, “छोटे खेडेगाव असूनही येथील ग्रंथालयाचे संवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे. तसेच पुस्तकांचा संग्रह फार छान केला आहे.”पुस्तकांची आकर्षक मांडणी आणि सुव्यवस्था पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले राहुल सुरवसे यांनीही हे ‘छोटे पण संपन्न ग्रंथालय’ पाहून कौतुक केले.कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेंद्र शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले आणि त्यांनी आवर्जून भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांचे आभार मानले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील एका सार्वजनिक वाचनालयाला भेट देऊन मार्गदर्शन केल्याने वाचनालयाच्या सेवकांना आणि वाचकांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.




