राष्ट्रवादी प्रवक्ते मोहनराव रोकडे यांनी दिली दौऱ्याची माहिती; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

 ‘गट व गण’ निहाय रणनीतीवर देणार भर

पारनेर/प्रतिनिधी :
 आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्याचे राजकीय मैदान आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. खासदार निलेश लंके यांनी शनिवार दि. २५ एप्रिल रोजी तालुक्याचा विशेष दौरा आयोजित केला असून, या दौऱ्याच्या माध्यमातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीची चाचपणी करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे यांनी या दौऱ्याची अधिकृत माहिती देताना स्पष्ट केले की, हा दौरा केवळ औपचारिक नसून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याच्या उद्देशाने आखण्यात आला आहे.


शनिवार, २५ एप्रिल रोजी सकाळी पारनेर शहरातून सुरू होणारा हा दौरा तालुक्याच्या विविध भौगोलिक भागांना कव्हर करणार आहे. यामध्ये ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, जवळा, निघोज आणि सुपा यांसारख्या प्रमुख जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. या प्रत्येक ठिकाणी खासदार लंके स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या सूचना देतील. विशेषतः ‘गट आणि गण’ निहाय बांधणीवर त्यांचा भर असणार असून, उमेदवारी वाटप आणि प्रचाराच्या धोरणांबाबत या दौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

या दौऱ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘निलेश लंके प्रतिष्ठान’ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्ष)’ यांच्या वतीने होणारी विविध शाखांची उद्घाटने. या माध्यमातून खासदार लंके आपली संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 निवडणुकांच्या तोंडावर नेत्याने स्वतः कार्यकर्त्यांच्या भेटीला जाणे आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेणे, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या दौऱ्याच्या सांगता समारंभापर्यंत तालुक्यातील राजकीय समीकरणे कोणती नवी वळणे घेतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *