पारनेर / प्रतिनिधी,
निघोज गावातून कुंड येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ व मळगंगा माता मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी समस्त ग्रामस्थ, ग्रुप ग्रामपंचायत व मळगंगा ग्रामविकास ट्रस्टच्या वतीने पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निघोज गावाची लोकसंख्या सुमारे २० हजार असून कुंड हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. कुंड येथे मळगंगा मातेचे मंदिर असल्याने दर्शनासाठी तसेच पर्यटनस्थळ पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. मात्र, निघोज ते कुंड हा महत्त्वाचा मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असल्याने भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे निघोज ते कुंड या अंदाजे ३.५ किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर करून कामास तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यामुळे निघोज व कुंड परिसरातील नागरिकांसह मळगंगा मंदिर आणि पर्यटनस्थळी येणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी सोय होणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, प्रभाकर नारायण कवाद, ज्ञानदेव नामदेव लंके, भाऊसाहेब विठोबा लामखडे, वसंत काशिनाथ ढवण, रोहिदास सावकार लामखडे, सोमनाथ दौलत वरखडे व रमेश भाऊ वरखडे आदी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“निघोज – कुंड हा केवळ दोन गावांना जोडणारा रस्ता नसून, तो नागरिकांच्या दैनंदिन गरजांसोबतच मळगंगा माता मंदिर आणि कुंडच्या पर्यटनस्थळाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता ग्रामस्थांनी केलेली मागणी रास्त असून, त्याला प्राधान्य देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू. भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणे ही आपली जबाबदारी आहे. निघोज–कुंड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,”
आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)




