पारनेर | प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील पांढरे वस्तीवरील नागरिकांचा स्वातंत्र्यकाळापासून सुरू असलेला पक्क्या रस्त्याचा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा-२) अंतर्गत साकारलेल्या डांबरी रस्त्याचे लोकार्पण रविवारी (दि. ९ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
सिद्धेश्वर ओढ्याच्या पात्रामुळे अनेक दशकांपासून पांढरे वस्तीचा गावाशी संपर्क पावसाळ्यात खंडित होत होता. त्यामुळे येथील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, शेती आणि दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या डांबरी रस्त्यामुळे पिढ्यान्पिढ्या विकासापासून वंचित राहिलेल्या वस्तीला अखेर कायमस्वरूपी दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२’ अंतर्गत सुमारे ₹१४२.३९ लाख खर्चून हा रस्ता उभारण्यात आला आहे. या कामासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे सहकार्य लाभले असून, विश्वनाथ दादा कोरडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा बहुप्रतीक्षित प्रश्न मार्गी लावल्याचे आयोजकांनी सांगितले.
गांजीभोयरे येथे होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास अध्यक्ष म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित राहणार असून, विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महायुती पारनेर तालुका व विश्वनाथ दादा कोरडे युवा मंच, पारनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.




