देसवडे येथे १ कोटीच्या रस्ते कामांचे भूमिपूजन; पारनेर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर रस्त्यांचे जाळे विणणार


पारनेर/प्रतिनिधी : 
तालुक्याचा विकास साधायचा असेल तर विकासाचा दूरदृष्टीकोन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पारनेर हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका असून, येथील शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसांत शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हीच अडचण ओळखून पानंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी केले. पारनेर तालुक्यातील देसवडे येथे विविध योजनांतर्गत मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या गावांतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील आणि शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना झावरे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत गोगावले यांच्या माध्यमातून आमचे तरुण सहकारी संजीव भोर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच या विकासकामांसाठी १ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. पारनेर तालुक्यातील गावांचे क्षेत्रफळ मोठे असल्याने दळणवळणाचा प्रश्न गंभीर असतो. म्हणूनच, आगामी काळात तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आणि वाडीवस्त्यांपर्यंत पक्के रस्ते पोहोचवण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधी आणण्याचा आमचा मानस आहे.
या कार्यक्रमादरम्यान देसवडे परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गावांतर्गत पोखरी घाट ते टेकुडेवाडी रस्ता, सखाहरी फटांगरे घर ते जुंबर सोंड रस्ता, काळेवाडी रस्ता ते गुंड वस्ती रस्ता, काळेवाडी रस्ता ते कानडे वस्ती रस्ता आणि देसवडे ते सुतारदरा रस्ता या पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा प्रवासाचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, ज्येष्ठ नेते निजाम पटेल, माजी चेअरमन संजय भोर, भाऊसाहेब टेकुडे, सरपंच पोपट दरेकर, कारभारी टेकुडे, रावसाहेब फटांगरे, वैभव गुंड, अमीन पटेल, बाळासाहेब वाडेकर, रावसाहेब गोळे, राजू भोर, राहुल पारधी, देविदास टेकुडे, योगेश दाते, अविनाश भोर, अजित वाडेकर, शुभम टेकुडे, विशाल वाडेकर, उल्हास दरेकर, काशिनाथ गोळे, योगेश गुंड, सुनील कानडे, अजित भोर आणि नवले गुरुजी यांच्यासह परिसरातील युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील रखडलेले रस्ते मार्गी लागत असल्यामुळे देसवडे पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



🔶🔶🔶🔶🔶🔶
शिवसेना हा कार्यकर्त्यांना नेहमीच ताकद आणि बळ देणारा पक्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सहकारी आता शहरांसोबतच ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करत आहोत. ग्रामीण भागातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शिवसेनेचे संघटन आणि विचारांचे जाळे भक्कमपणे पसरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

– संजीव भोर (शिवसेना प्रवक्ते)

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावातील वाडी-वस्त्यांवरील रस्त्यांचा एक विशेष ‘मास्टर प्लॅन’ तयार करत आहोत. या रस्त्यांचे काम सध्या वेगाने सुरू असून, त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून देण्यासाठी आणि आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आम्ही शासन दरबारी सातत्याने प्रयत्नशील आहोत. 

– सुजितराव झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष, जि. प.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *