Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeदेसवडेदेसवडे येथे शासन आदेशाची होळी; कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक - भूमिपुत्र शेतकरी...

देसवडे येथे शासन आदेशाची होळी; कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक – भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा आक्रमक प्रवित्रा



देसवडे (पारनेर), 
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयात जाचक अटी व शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पारनेर तालुक्यातील देसवडे येथे शेकडो शेतकरी एकत्र येत शासन आदेशाची होळी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निवडणुकीपूर्वी “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी आश्वासने देणाऱ्या सरकारने आता कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

संतोष वाडेकर म्हणाले की, “सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात बहुसंख्य शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ दिला जात आहे. २०१९ मध्ये कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना, ते सध्या थकीत असले तरी, पूर्ण लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही दोन वर्षांची अट घालून अन्याय करण्यात आला आहे.”

त्यांनी पुढे आरोप केला की, अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले असून शेडनेट, पॉलीहाऊस, कुक्कुटपालन तसेच शेती सुधारणा कर्जधारक शेतकऱ्यांनाही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप असल्याचे दिसून आले. राज्यभर विविध ठिकाणी आंदोलनांची ठिणगी पडत असून, शेतकरी संघटना आता अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

🛑भूमिपुत्र शेतकरी संघटनेने सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
• कर्जमाफीवरील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात.
• सर्व शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी लागू करावी.
• नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही संपूर्ण लाभ द्यावा.
• शेडनेट, पॉलीहाऊस, कुक्कुटपालन व शेती सुधारणा कर्जांचा समावेश करावा.
• सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा.

“शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. मात्र त्याच शेतकऱ्याला कर्जाच्या ओझ्याखाली दबवून शासन केवळ घोषणा आणि प्रत्यक्षात फसवणूक करत असेल तर ती सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात संतोष वाडेकर, पोपट दरेकर, संतोष टेकुडे, विशाल वाडेकर, ठमाजी भोर, रावसाहेब फटांगरे, काशिनाथ गोळे, मंजाबापू वाडेकर, पंडित गागरे, साहेबराव भोर यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments