अहिल्यानगर : प्रतिनिधी
निघोज (ता. पारनेर)येथील माता मळगंगा देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी प्रशासनाच्या दोन महत्त्वाच्या विभागांना स्वतंत्र पत्रे पाठवत यात्रेच्या नियोजनात सक्रिय पुढाकार घेतला आहे. दिनांक १० ते १३ एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ४ ते ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी वीज व पाणी या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.
यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने प्रकाश व्यवस्था, दुकाने, धार्मिक कार्यक्रम, आरोग्य सेवा व वाहतूक व्यवस्थेसाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. याची दखल घेत खासदार लंके यांनी विद्युत वितरण महामंडळाच्या उप कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोडशेडिंग टाळणे, तांत्रिक बिघाड तात्काळ दूर करणे, अतिरिक्त यंत्रणा सज्ज ठेवणे आणि पर्यायी उपाययोजना उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यात्रेदरम्यान पाण्याची उपलब्धता राहण्यासाठी खासदार लंके यांनी कुकडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून कुकडी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. एस्केप क्रमांक ४४ मधून निघोज गावातील तसेच कुकडी नदीतील के.टी. वेअरमध्ये पाणी सोडल्यास ओढा व नदीत पाण्याची पातळी वाढून यात्रेतील विविध गरजा पूर्ण होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
यात्रेदरम्यान भाविक मोठ्या संख्येने स्नान, पूजन व इतर धार्मिक विधी करतात. यासाठी ओढा व नदीत पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण राखण्यासाठीही पाण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
वीज व पाणी या दोन्ही सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन खासदारांनी केले आहे. यात्रेच्या काळात सतत देखरेख ठेवून कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वलाखो भाविक यात्रेत सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीज व पाण्याच्या अडचणीमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
खासदार लंके यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनानेही तयारीला वेग दिला असून, वीज व पाण्याची योग्य व्यवस्था झाल्यास यंदाची मळगंगा यात्रा सुरक्षित, स्वच्छ व सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




