पारनेर / भगवान गायकवाड, 
शिक्षण आणि विज्ञानाची कास धरत, समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. शुभम तांबे (कान्हूर पठार) आणि डॉ. वैष्णवी गवांदे (मांडवगण) यांचा शुभविवाह रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि मंगलमय वातावरणात ‘सत्यशोधक’ पद्धतीने संपन्न झाला.

     वैद्यकीय क्षेत्रातील या दोन उच्चशिक्षित तरुणांनी पारंपारिक थाटामाटाऐवजी वैचारिक क्रांतीचा मार्ग निवडल्याने या विवाहाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.महात्मा जोतिराव फुले यांनी प्रस्थापित केलेली सत्यशोधक विवाह पद्धती ही मानवी समता, विवेकवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित आहे. डॉ. शुभम आणि डॉ. वैष्णवी यांनी वैद्यकीय पेशात काम करताना समाजातील अनिष्ट प्रथा आणि लग्नाकार्यात होणारा अवाजवी खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी जपत, नव्या पिढीला दिशा देण्यासाठी त्यांनी या क्रांतिकारी पद्धतीचा अवलंब केला.

या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात पारंपारिक धार्मिक विधींना फाटा देत सत्यशोधक मंगलाष्टकांचे वाचन करण्यात आले. वधू-वरांनी एकमेकांना भारतीय संविधानातील मूल्यांची साक्ष ठेवून आणि एकमेकांच्या प्रगतीत खंबीरपणे साथ देण्याच्या शपथा घेतल्या. मंगलाष्टकांमधून स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक कर्तव्याचा संदेश देण्यात आला. कुमारी प्रतीक्षा झिने यांनी गायिलेल्या मंगलाष्टकांनी वातावरणात एक वेगळीच चैतन्य निर्माण केले.हा सोहळा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून ती एक सामाजिक चळवळ ठरली. “सुशिक्षित तरुण पिढीने, विशेषतः डॉक्टरांसारख्या जबाबदार व्यावसायिकांनी असा पुढाकार घेतल्यास समाजातील अनिष्ट प्रथांना नक्कीच पायबंद बसेल,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. हा विवाहविधी लावण्यासाठी संतोष बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.”आमच्या आयुष्याची सुरुवात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतेच्या विचारातून व्हावी, अशी आमची इच्छा होती,” अशी भावना नवदाम्पत्याने यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणा आणि वैचारिक प्रगल्भतेने नटलेल्या या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत असून, डॉ. शुभम आणि डॉ. वैष्णवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *