पारनेर / ता. प्रतिनिधी 

महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनात म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी विविध लोकहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे मांडणी करत शासनाचे लक्ष वेधले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत बोलताना आमदार दाते यांनी सांगितले की, राज्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी डॉक्टर व नर्सेसच्या मोठ्या प्रमाणातील रिक्त जागांमुळे नागरिकांना अपेक्षित सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. राज्यात अजूनही सुमारे ३९८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २८०६ उपकेंद्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच २००६ पासून लागू असलेल्या एमबीबीएस बंधपत्र धोरणात बदल करून इच्छुक डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवा देण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ऊर्जा विषयावर बोलताना आमदार दाते यांनी राज्याच्या स्वयंपूर्ण ऊर्जाधोरणाचे स्वागत केले; मात्र सौरऊर्जा प्रकल्प अपूर्ण असल्याने ग्रामीण भागात संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याची गंभीर समस्या मांडली. यामुळे शेतकरी, विद्यार्थी व गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगत महावितरणला तातडीने योग्य सूचना देण्याची मागणी केली.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मतदारसंघातील नांदगाव, शिंगवे, ढवळपुरी, ढोकी, धोत्रे, निघोज, भाळवणी, वडगाव आमली आदी गावांमध्ये कांदा, कलिंगड, डाळिंब, टोमॅटो, आंबा व गहू पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची त्यांनी शासनाकडे केली. 

औद्योगिक विकासाच्या संदर्भात बोलताना आमदार दाते यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचे नमूद केले. मात्र MIDC साठी शेतकऱ्यांकडून महागड्या दराने जमीन खरेदी करण्याऐवजी उपलब्ध सरकारी माळरान जमिनीचा उपयोग करण्याचा विचार शासनाने करावा, असे सुचवले. 

तसेच अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील चौकशीबाबत पारदर्शकता राखत जनतेसमोर माहिती यावी, अशीही त्यांनी मागणी केली.

पर्यटन विकासाच्या दृष्टीने निघोज येथील रांजण खळगे, दर्याबाई, वेल्हाबाई परिसर तसेच सिद्धेश्वर मंदिर यांसारख्या निसर्गरम्य स्थळांचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सांगत मतदारसंघातील पर्यटनाला चालना देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

लोकहिताच्या विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण व ठाम मांडणी करत आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मतदारसंघाचा आवाज बुलंद केल्याने त्यांच्या कार्यशैलीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *