पारनेर / भगवान गायकवाड, 
पारनेर येथील ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय’ सेवा केंद्राच्या वतीने अधिक मास (धोंड्याचा महिना) निमित्त आयोजित करण्यात आलेला विशेष ‘ब्रह्मा भोजनाचा’ कार्यक्रम केवळ एक धार्मिक विधी न ठरता, तो समाजात एक प्रगल्भ आध्यात्मिक संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो माता आणि बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे राजेश्वरी दीदी, निर्मला दीदी, सुवर्णा दीदी, उज्वला दीदी आणि सविता दीदी , सुषमा दिदी, पद्मा दिदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी केंद्राच्या संचालिका साधना दीदी यांनी उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमाची महती विशद केली.कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक राजेश्वरी दीदी आणि निर्मला दिदी यांनी अधिक मासाचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना परंपरेकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला. त्या म्हणाल्या, “अधिक मास हा तीन वर्षांतून एकदा येतो आणि हा काळ पुण्य संचय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपण गोदान, अन्नदान किंवा वस्त्रदान करतोच, पण खऱ्या अर्थाने दान म्हणजे आपल्यातील विकार त्यागून सुख, शांती, प्रेम आणि आनंदाची वृत्ती सर्वांना वाटणे होय.”

अधिक मासात मुलगी आणि जावयाला धोंडे खाऊ घालण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकत त्यांनी स्पष्ट केले की, ३३ आणरसे वाण देणे म्हणजे केवळ एक प्रथा नसून, ३३ कोटी देवी-देवतांचे गुण आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा तो एक संकल्प आहे. ‘नर ते नारायण’ होण्याचा प्रवास म्हणजेच मानवाने स्वतःमधील दैवी शक्ती जागृत करून सात्त्विक जीवन जगणे, हाच यामागचा खरा आध्यात्मिक संकेत आहे.सुषमा दीदींनी या काळाला ईश्वरी स्मृतीचा काळ असे संबोधले. ज्याप्रमाणे ५,००० वर्षांच्या सृष्टी चक्रानंतर परमात्मा या पृथ्वीवर अवतरून आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन घडवतात, त्याच स्मृतीप्रीत्यर्थ हा अधिक मास येतो. हा महिना आपल्याला आपली मूळ ओळख करून देणारा आणि ईश्वरी गुणांची आठवण करून देणारा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.या उपक्रमामुळे उपस्थितांना केवळ अन्नाचा आस्वाद घेता आला नाही, तर त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली. धार्मिक प्रथांकडे निव्वळ बाह्य आचरणाऐवजी आंतरिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून कसे पाहावे, हे या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे जोरदार स्वागत केले असून, ब्रह्माकुमारी केंद्राच्या या समाजप्रबोधन कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमामुळे पारनेरकरांच्या मनातील अधिक मासाविषयीची धारणा अधिक दृढ आणि आध्यात्मिक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *