आजचे युग हे ‘माहितीचे युग’ आहे असे आपण अभिमानाने सांगतो. हातात स्मार्टफोन, खिशात विज्ञानाने दिलेली गॅजेट्स आणि डोळ्यासमोर जागतिक प्रगतीची स्वप्ने असताना, एक विदारक सत्य आपल्या समाजाला पोखरत आहे—ते म्हणजे ‘अंधश्रद्धा’. अध्यात्माच्या गोंडस नावाखाली चालणारा हा बाजार आज सुशिक्षित घराघरांत पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

१. सुशिक्षितपणा म्हणजे फक्त पदव्या नव्हेत
आपण चार पुस्तके वाचली, विज्ञानाचे धडे गिरवले, पण तरीही जर आपण एखाद्या ‘बुवा-बाबा’च्या आंघोळीचे पाणी तीर्थ म्हणून पित असू, तर आपली शैक्षणिक प्रगती शून्य आहे. शिक्षण माणसाला ‘प्रश्न’ विचारायला शिकवते, ‘शरण’ जायला नाही. जेव्हा माणूस स्वतःचा मेंदू वापरणे थांबवतो आणि तर्कहीन गोष्टींवर विश्वास ठेवतो, तेव्हा तो वैचारिकरीत्या अपंग होऊ लागतो.

मित्रांनो, तुम्ही या देशाचे भविष्य आहात. घरामध्ये आई-वडील किंवा वडीलधारी माणसे जेव्हा संकट काळात हताश होतात, तेव्हा त्यांना आधाराची गरज असते. नेमक्या याच वेळी भोंदूगिरीचा शिरकाव होतो.आपल्या घरातील कोणी अशा फसव्या जाळ्यात तर अडकत नाहीये ना? श्रद्धेला आंधळेपणाचे स्वरूप येऊ देऊ नका. देव हा घाबरवणाऱ्या कर्मकांडात नसून माणुसकीत आणि कर्मात आहे, हे त्यांना पटवून द्या .अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे, मनःशांती मिळवणे आणि नीतिमानाने जगणे. पण जिथे भीती दाखवून पैसे उकळले जातात, जिथे अघोरी उपाय सांगितले जातात, तिथे अध्यात्म संपते आणि ‘धंदा’ सुरू होतोl “ज्या धर्मात किंवा संप्रदायात माणसाला स्वतःचा विचार करण्याचे स्वातंत्र्य उरत नाही, ती गुलामगिरीची पहिली पायरी असते.”विवेकाचा जागर करा.

विज्ञानाने आपल्याला चंद्र-मंगळापर्यंत पोहोचवले, मग आपण अजूनही ‘लिंबू-मिरची’ आणि ‘चमत्कारांच्या’ मागे का धावतोय? संकटे ही कष्टाने आणि नियोजनाने दूर होतात, कोणाच्याही अंगारा-धुपाने नाही. कष्टावर विश्वास ठेवा, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा.

तरुणांनो, नास्तिक व्हा असे कुणीही म्हणत नाही, पण ‘सज्ञान’ व्हा! आपल्या बुद्धीला गहाण ठेवू नका. समाजातून या मानसिक अज्ञानाचे मूळ उपटून टाकण्यासाठी आधी स्वतःपासून सुरुवात करा. तुमचा विवेक हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे.
जागे व्हा… कारण तुमची प्रगती हीच समाजाची खरी क्रांती आहे!

       पत्रकार…. भगवान गायकवाड 
                         दैनिक वीरभूमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *