जमाअत – ए- इस्लामी हिंद, कब्रस्तान मस्जिद मध्ये वैचारिक जागर
पारनेर / भगवान गायकवाड,
“महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे वारकरी संप्रदायातील संतांनी आणि मुस्लिम सुफी संतांनी आपल्या कार्यातून केवळ भक्तीचाच नव्हे, तर समता, बंधुता आणि मानुसकीचा मार्ग दाखवला आहे. आजच्या काळात सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही परंपरांच्या विचारांची मोठी गरज आहे,” असे परखड मत प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज परभणीकर यांनी व्यक्त केले. ते जमाअत ए इस्लामी हिंद पारनेर कब्रस्तान मज्जिद येथे आयोजित वैचारिक जागर प्रबोधन प्रसंगी आयोजित विशेष प्रवचन सोहळ्यात ‘वारकरी संत आणि सुफी परंपरा : एक सामाजिक अनुबंध’ या विषयावर ते बोलत होते.
ह.भ.प धर्मकिर्ती महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत वारकरी आणि सुफी संतांच्या शिकवणीतील साम्य अधोरेखित केले. ते म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडतात. तसाच विचार सुफी संतांनी ‘मोहब्बत’ आणि ‘खिदमत-ए-खल्क’ (मानवतेची सेवा) या माध्यमातून दिला आहे. “वारीतील भगवा झेंडा आणि सुफी दर्ग्यांवरील संदेश हे दोन्हीही द्वेष मिटवून प्रेमाची पेरणी करण्याचे काम करतात. संतांनी कधीही माणसांत भेदभाव केला नाही, मग आपण का करावा?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराजांनी आपल्या भाषणात संत नामदेव महाराज आणि सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. ‘शेख महंमद अविंध, त्याचे हृदयी गोविंद’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम संस्कृती शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आली आहे. हीच संस्कृती खऱ्या अर्थाने भारताची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून समाजात पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले. “जर आपण ज्ञानेश्वरी आणि सुफींचे तत्वज्ञान नीट समजून घेतले, तर समाजात कधीही तेढ निर्माण होणार नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, हाच खरा धर्म आहे,” असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या शेवटी महाराजांनी उपस्थित जनसमुदायाला सामाजिक सलोखा राखण्याची शपथ दिली. या प्रबोधनपर सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, महाराजांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
भारतीय समाज मनाला आकार देण्यास संतांची भक्ती आणि सुफींची सुफीझम या दोन विचार धारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा आणि सूफी परंपरा या दोन्हीचा मूळ आधार माणुसकी हाच आहे. त्यांनी जात, धर्म आणि पंथांच्या भिंती ओलांडून विठ्ठल आणि अल्लाह यांना मानवी रूपात पाहिले आहे. दोन्ही प्रवाहांनी कर्मकांडापेक्षा अंत शुद्धीला महत्व दिले. समाजातील द्वेष दूर करून प्रेमाचा संदेश देणे हेच दोन्ही विचारधारांचे साध्य आहे. आधुनिक काळात जाती धर्म विरहित समाज घडविण्यासाठी संतांची हि समतेची शिकवण आजही दीप स्तंभासारखी मार्गदर्शक आहे.
– डॉ. रफिक सय्यद, संत साहित्याचे गाढे अभ्यासक.




