पारनेर / भगवान गायकवाड, 
       लोहार समाजातील सचिन बबन इघे (वय २९) यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या एका अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. लहानपणापासूनच अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या सचिन यांनी मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा हिमतीने सांभाळ केला होता. मात्र, त्यांच्यावर काळाने मोठा घाला घातला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली आणि केवळ तीन महिन्यांचा लहान मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची उपजीविका पूर्णपणे थांबली असून, त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे समाजाचा आधारस्तंभ सचिन यांच्या कुटुंबाला या कठीण काळात समाजाकडून मोठा आधार मिळत आहे. रवींद्र राजाराम पवार (सदस्य, गाडी लोहार युवा मंच, कोल्हापूर) यांनी पीडित कुटुंबाला तात्काळ ₹२०,००० रुपयांची भरीव आर्थिक मदत केली आहे.
 त्याचबरोबर, त्यांच्या खडकवाडी गावातील मराठा बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करून सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण दिले. 

लोहार समाजातील बांधवांनी दशक्रियेच्या दिवशीच एकत्र येत ₹४८,००० रुपयांची आर्थिक मदत देऊन आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

राज्यस्तरीय लोहार वधू-वर मेळाव्यात मोठा धनादेश प्रदान….
या कुटुंबाला आणखी एक मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित होत असलेल्या राज्यस्तरीय वधू-वर लोहार मेळाव्याच्या निमित्ताने अखिल लोहार समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ₹५१,००० रुपयांचा चेक पीडित कुटुंबाला देण्यात येणार आहे. अध्यक्ष संदीप दादा थोरात यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब इघे (सहसचिव, महाराष्ट्र राज्य) यांनी दिली. 

राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी लोहार समाज संघ महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने कार्यरत आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असणारे प्रमुख पदाधिकारी सचिव डॉ. मुकुंद लोखंडे, उपाध्यक्ष विश्वनाथ लोखंडे, खजिनदार निवृत्ती पोपळघट, कार्यकारी अध्यक्ष नवनाथ हराळे, स्वागत अध्यक्ष हर्षल आगळे, प्राचार्य सुभाष कौसे, प्रभाकर लाड, आप्पा लोहार, लोहार युथ फाऊंडेशन, प्रसिद्धीप्रमुख रोहिणी ताई हराळे, मनोज लोखंडे व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात समाजासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या बांधवांना लोहार भूषण, मरणोत्तर, शैक्षणिक, हिरकणी आणि जीवनगौरव यांसारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार असल्याचे बाळासाहेब इघे यांनी यावेळी सांगितले. पीडित कुटुंबाला मदत करणे आणि समाजातील गुणवंतांना सन्मानित करणे, हा या मेळाव्याचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *