निघोज (प्रतिनिधी):
 शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रूपेश ढवण आणि महेंद्र पांढरकर यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बुधवारी निघोज येथील मुख्य चौकात शेतकरी आणि वारकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत पाठिंबा दिला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ढवण यांनी शासकीय उदासीनतेवर नाराजी व्यक्त करत, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. रस्ता रोको शांततेत मागे घेण्यात आला.

आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, माजी सरपंच ठकाराम लंके, टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला. वारकरी संप्रदायाचे पाईक हभप पवन महाराज तनपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांनी कांदा आणि शेतीमालाच्या भाववाढीसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याबद्दल खंत व्यक्त केली.


खासदार निलेश लंके यांनी दूरध्वनीवरून पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कांदा प्रश्न केंद्र सरकारच्या निदर्शनास आणण्याचे आश्वासन दिले. आमदार काशिनाथ दाते यांनीही मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांशी पत्रव्यवहार करून नाफेडमार्फत कांदा खरेदीचे निर्देश देण्याचे जाहीर केले. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी ढवण आणि पांढरकर यांचे कौतुक करत “एकच पक्ष, कांदा प्रश्न” अशी घोषणा दिली.

निघोज परिसरातील हा सर्वांत मोठा रस्ता रोको ठरला. शेतकरी आणि वारकऱ्यांच्या एकजुटीने प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दबाव वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *