पारनेर/प्रतिनिधी,
अळकुटी (ता. पारनेर) येथील नित्यसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यात सातत्याने योगदान देणारे डॉ. भास्करराव शिरोळे यांची नुकतीच शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना शिवसेनेचे वरिष्ठ नेते व विभागीय संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याबाबत माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून डॉ. शिरोळे यांना जिल्हा पातळीवरील महवत्त्वाचे पद द्यावे अशी मागणी केली होती. या मागणी-वर तत्काळ प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनी आमदार शिंदे यांना सूचना देऊन मंगळवारी (दि. २४) डॉ. शिरोळे यांची जिल्हा उपप्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली. नियुक्तीची माहिती मिळताच पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. या निवडीबद्दल शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक आणि नागरिकांनी डॉ. शिरोळे यांचे अभिनंदन केले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
डॉ. शिरोळे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजकार्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वारीसाठी पंढरपूरला पायी जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील वारकऱ्यांची वैद्यकीय माध्यमातून सेवा केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रांत त्यांचे मोठे योगदान आहे. परिसरातील सुखादुःखात सातत्याने सहभागी होणारे एक सामाजिक नेतृत्व म्हणून त्यांचा जिल्ह्यात लौकिक आहे.
– जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे





