पारनेर कलाभूषण पुरस्काराचे वितरण

पारनेर / भगवान गायकवाड, 
 विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त गुणांना वाव दिल्याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्व फुलत नाही. विविध कलात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे उपक्रम राबविण्यात पारनेर तालुका आघाडीवर आहे, असे प्रतिपादन पारनेरचे गटशिक्षणाधिकारी कांतिलाल ढवळे यांनी केले.

पुणेवाडी येथे पारनेर तालुका कलाशिक्षक संघटना व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मार्फत कलाशिक्षक कार्यशाळा, पारितोषिक व कलाभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी प्राचार्य शिवाजीराव चेडे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर गझलकार संजय पठाडे, शिक्षण संस्थेचे मोहनराव रेपाळे, तुषार सोनवणे, उत्तम गायकवाड, चित्रकार अनिता सावंत, प्राचार्य राम पवार, जिल्हाध्यक्ष रविंद्र गायकवाड, जिल्हा सचिव मंगेश काळे,शिक्षक बॅंकचे संचालक विजय पठारे उपस्थित होते.

भैरवनाथ देवस्थानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री धर्मनाथ विद्यालय, जवळा येथील कलाशिक्षक संतोष कवडे आणि पुणेवाडी विद्यालयातील कलाशिक्षक मिरा पुजारी यांना पारनेर कलाभूषण पुरस्काराने गैरविण्यात आले. पंचायत समिती शिक्षण विभाग व कलाशिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय समूहगायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले.

लहान गटात प्रथम क्रमांक पिंपळनेर येथील संत निळोबाराय विद्यालय, द्वितीय क्रमांक सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूल तर तृतीय क्रमांक रांजणगाव मशिद येथील श्री शिवाजी विद्यालयाने पटकावला. मोठ्या गटातील प्रथम क्रमांक पळवे येथील श्री भैरवनाथ विद्यालय, द्वितीय क्रमांक पिंपळगाव रोठा येथील श्री खंडेश्वर विद्यालय तर तृतीय क्रमांक पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल यांनी प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यालयांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दुसर्या सत्रात कलाशिक्षक कार्यशाळा घेण्यात आली. यात शासकीय रेखाकला परीक्षा, बाल चित्रकला स्पर्धा यावर चर्चासत्र झाले तर काही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शेवटच्या सत्रात संजय पठाडे, साहेबराव घुले, अनिता सावंत यांचे कवी संमेलन झाले. त्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. 

याप्रसंगी गझलकार संजय पठाडे, तुषार सोनवणे, प्राचार्य राम पवार, डॉ. कारण ढेरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र गायकवाड, शिवाजीराव चेडे इत्यादींची भाषणे झाली. तालुका सचिव ज्ञानेश्वर कवडे यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष कानिफनाथ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर कलाश्रुती वाळुंज यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष कानिफनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांसोबतच साहेबराव घुले, नवनाथ झावरे, ज्ञानेश्वर कवडे, कैलास विटनोर, विश्वनाथ धुमाळ, शरद आंधळे, प्रतिभा फलके, कलाश्रुती वाळुंज, शीतल आंधळे, अनिता पांडे, शैलेंद्र ठुबे, आबासाहेब गाडे, नारायण शेळके, अनिल चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *