पारनेर | ता. प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील रमेश बाबासाहेब शेळके यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेस होत असलेल्या विलंबामुळे नातेवाईकांसह उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याची माहिती मिळताच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या वेळी तत्परतेने धाव घेऊन प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारी आमदार काशिनाथ दाते सरांची कार्यशैली यावेळी पुन्हा एकदा दिसून आली. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संबंधित प्रक्रिया वेगाने मार्गी लागली असून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रितेश पानमंद यावेळी उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देणे आणि प्रशासनाला जबाबदार धरणे, हीच आमदार काशिनाथ दाते सर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख असल्याची भावना यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली.
🔸 चौकट : पारनेर ग्रामीण रुग्णालय पोहोचल्यानंतर उपस्थित नातेवाईक व नागरिकांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली, त्यानंतर पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश लोंढे यांना शवविच्छेदन करण्यात विलंब झाल्याबद्दल जाब विचारला, जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधत संबंधित शवविच्छेदन प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे ही गंभीर बाब असून, आपल्या कर्तव्यात कुचराई करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या.
आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)




