समूह गायनातून बरसले बालचमूचे सूर

 पारनेर / भगवान गायकवाड,
भौतिक संपन्नतेतून मिळणारा आनंद क्षणभंगुर असतो. कलेच्या उपासनेतून जिवनातील निखळ आनंद मिळतो आणि मनाचे सौंदर्य वाढते, असे प्रतिपादन जिल्हा कलाशिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय पठाडे यांनी केले. ते पारनेर येथील तालुकास्तरीय समूह गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
         पारनेर तालुका कलाशिक्षक संघटना व पारनेर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथे तालुकास्तरीय शालेय समूहगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन संजय पठाडे, प्राचार्य नानासाहेब काळे, तबलावादक महेंद्र पळसकर, तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष बापू होळकर इत्यादींच्या उपस्थितीत झाले. यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त अजिनाथ ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. 
            तालुका कलाशिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयातील सतरा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या निमित्ताने सादर झालेल्या अभंग, गवळण, देशभक्तीपर गीत, पर्यावरण गीत, प्रबोधन गीत अशा विविध गीतांमधून बालचमूंचे सूर बरसले. उपस्थितांनी त्याचा आनंद घेतला. यावेळी संघाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. महेंद्र पळसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. लहू रणशूर यांनी हार्मोनियम तर वेदांत गायकवाड व सिद्धार्थ कळमकर यांनी तबला साथ केली. 
          उद्घाटन प्रसंगी प्राचार्य नानासाहेब काळे, महेंद्र पळसकर, बापू होळकर यांची भाषणे झाली. तालुका कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष कानिफनाथ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तालुका सचिव ज्ञानेश्वर कवडे यांनी सूत्रसंचालन केले तर महिला विभाग प्रमुख प्रतिभा फलके यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा सचिव मंगेश काळे, जिल्हा कोषाध्यक्ष आबासाहेब गाडे, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव घुले, तालुका कोषाध्यक्ष शरद झावरे, सहसचिव नवनाथ झावरे, कलाश्रुती वाळुंज, मिरा पुजारी, सुवर्णा पांडे, कल्पना नरसाळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *