पारनेर / भगवान गायकवाड,
लोकप्रतिनिधींची प्रबळ इच्छाशक्ती आणि ग्रामस्थांची साथ असेल तर गावाचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचे उत्तम उदाहरण पारनेर तालुक्यातील पळसपूर गावाने समोर ठेवले आहे. सरपंच रूपाली वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांत तब्बल ४ कोटी ६० लाख ६४ हजार रुपयांच्या विकासकामांचा टप्पा पूर्ण करून पळसपूरने तालुक्यात विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. यामध्ये खासदार निधी, आमदार निधी, स्थानिक विकास निधी, १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधारणा योजना आणि जलयुक्त शिवार अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून हा अवाढव्य निधी गावात खेचून आणला आहे.
पाणी, रस्ते आणि शिक्षणावर भर विकासाच्या या प्रवासात पळसपूरने मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य दिले आहे १ कोटी २८ लाख रुपये खर्चून आधुनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.रस्ते डांबरीकरण, शाळा खोल्यांचे नवीन बांधकाम आणि शेतपांदण रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.गावात सौर दिवे बसवण्यात आले असून तरुणांसाठी व्यायामशाळा साहित्य वाटप करण्यात आले आहे.
🔶🔶🔶🔶🔶
भविष्यातील नियोजित कामे….
आतापर्यंत ४० कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, विकासाची ही घोडदौड थांबलेली नाही. भविष्यात गावात सीसीटीव्ही कॅमेरे, नवीन रोहित्रे (DP) आणि भव्य सभामंडप यांसह एकूण ३१ कामे प्रस्तावित आहेत. यामुळे गाव अधिक सुरक्षित आणि सुसज्ज होणार आहे.
एकजुटीतून विकासाचे मॉडेल
पळसपूरच्या या यशात गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मार्गदर्शकांचा मोठा वाटा आहे. प्राचार्य रंगनाथ आहेर, चेअरमन रामदास ढोले, गणपतशेठ पवार, माजी सरपंच माधवशेठ पवार यांसह गावातील सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
समस्त ग्रामस्थ आणि सार्वजनिक मंडळांच्या सहकार्यामुळेच आज पळसपूर गाव विकासाच्या बाबतीत तालुक्यात अग्रेसर ठरत आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून केवळ ‘गावचा विकास’ हा ध्यास घेतल्यानेच पळसपूरचा हा कायापालट शक्य झाला असल्याचे सरपंच रूपाली वाघमारे यांनी सांगितले.




