पारनेर / ता. प्रतिनिधी  

मंगळवार दि. ३ मार्च २०२६
नगरसेवक अशोक चेडे यांच्यावर सुजित झावरे पाटील यांनी केलेल्या टीकेला चेडे यांनी तितक्याच खरमरीत शब्दांत उत्तर देत राजकीय वातावरण तापवले आहे. “चेडे यांना DPR चा लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का?” असा सवाल झावरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर चेडे यांनी थेट प्रत्युत्तर देताना म्हटले की, “क्लासरूमबाहेरची कुमक घेऊन बारावी पास झालेल्यांनी मला DPR शिकवण्याचा आव आणू नये. मी स्वतः १९९४ साली एम.एस्सी. केमिस्ट्री पदवीधर आहे.”

झावरे यांनी चेडे यांचा ‘छोटा घटक’ असा उल्लेख केल्यावर चेडे म्हणाले, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा राजकीय प्रोटोकॉल सारखाच असतो, हे कदाचित क्लासरूमच्या बाहेरची मदत घेऊन शिक्षण पूर्ण केलेल्यांना ठाऊक नसावे. जुने दाखले देवून बदनामी करावयाचीच असेल तर मग आम्हाला इतिहास विसरण्याचा आजार झालाय असंही कुणी समजू नये.   

शहर विकास आराखड्याबाबत झावरे यांनी केलेली विधाने ही केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप करत चेडे म्हणाले, “अभ्यास, आकडेवारी आणि वास्तव परिस्थिती समजून न घेता टीका करणे ही त्यांची जुनी सवय आहे. गावात फटाके वाजवून धूर केला म्हणजे काम होत नाही; त्यासाठी दम, अभ्यास आणि प्रशासनाशी समन्वय लागतो.”

शहर विकास आराखडा हा अत्यंत गंभीर विषय असून त्यासाठी तांत्रिक समज, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक असतो. मात्र झावरे यांनी केवळ राजकीय हित साधण्यासाठीच नाही तर राजकीय आकसातून व असुयेतून आरोपांची आतषबाजी केली आहे, “आता शब्दांच्या फुग्यांनी जनतेला भुलवण्याचे दिवस संपले असून प्रत्यक्ष कामच करावे लागते. काम करणारा आणि केवळ बोलघेवडेपणा करणारा यातला फरक जनतेला चांगलाच कळतो,” असा टोला लगावत चेडे यांनी झावरे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

“मी एक साधा, सर्वसामान्य व्यवसाय करणारा माणूस असून तालुक्यात मराठा समाजातील यशस्वी व्यावसायिक म्हणून गेली बत्तीस वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहे. माझी ओळख ही कोणत्याही राजकीय वारशावर नव्हे, तर कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजातील विश्वासावर उभी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार दाते सरांवर ग्रामपंचायत सदस्य होण्याचीही लायकी नाही, अशी टीका करण्यावर प्रत्युत्तर देताना चेडे यांनी चांगलाच समाचार घेतला. “दाते सरांवर बोट दाखवताना टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव विसरलात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “आयुष्यभर ‘सेटलमेंट’च्या राजकारणातून स्वतःची सोय साधत कार्यकर्त्यांच्या भावनांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता आता ओळखून आहे. शब्दांच्या तोफा डागून आणि तत्वज्ञानाचे डोस पाजळून वास्तव झाकता येत नाही. ज्यांच्या राजकीय प्रवासात सातत्यापेक्षा संधीसाधूपणा अधिक दिसतो, त्यांनी इतरांना लायकीचे धडे देण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे,” असा उपरोधिक टोला लगावत चेडे यांनी आपल्या टीकेची धार अधिक तीव्र केली.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 “ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता, अशांना तालुक्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने आमदार-खासदारपदापर्यंत पोहोचवले. पण जनतेच्या विश्वासाची परतफेड विकासाने करण्याऐवजी आपल्या राजकीय प्रवासाची गाडी पुढे जाण्या ऐवजी मागेच सरकली. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदापासून ‘नामधारी पाटील’ होईपर्यंतचा हा उलटा राजकीय प्रवास आपणास काहीतरी शिकवण देणारा ठरला पाहिजे,” “जनतेने दिलेल्या संधीचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी करणार की केवळ आरोप- प्रत्यारोपांच्या राजकारणात वेळ घालवणार?” 

– अशोक चेडे, नगरसेवक पारनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *