पारनेर / भगवान गायकवाड,
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि अपयशाच्या अनेक लाटा पचवत, पारनेर तालुक्यातील बुगेवाडी येथील प्रवीण दत्तात्रय शेळके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांची कर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल संभाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सोहळा सामाजिक प्रेरणेचा एक नवा आदर्श ठरला आहे.या सत्कार समारंभास युवा उद्योजक मंगेश दाते उद्योजक राजेंद्र औटी नियाज राजे, शेटे महाराज, दत्तात्रय शेळके, सुनील गाडगे, महेश ठुबे, किरण कुबडे, रियाज राजे, रमिज राजे, कस्तुरलाल सोनवणे, निलेश सोनवणे, इम्रान शेख, आवेज राजे, रेहान राजे, जुनैद राजे आणि दिपक शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रवीणच्या संघर्षाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रवीण शेळके यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर पण प्रेरणादायी राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण बुगेवाडीतील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण सेनापती बापट विद्यालय, पारनेर येथे पूर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील गेनबा सोपानराव मोझे इंजिनिअरिंग कॉलेज, वाघोली येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
२०१६ साली त्यांनी पुण्यातील ‘युनिक अकॅडमी’तून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांचा संघर्षाचा काळ सुरू झाला. प्रत्येक वर्षी ते पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र व्हायचे, परंतु अंतिम निकालात काही गुणांनी त्यांचे यश हुकायचे.
माझे अंतिम निवडीचे स्वप्न भंगले होते. तो काळ अत्यंत मानसिक दडपणाचा होता. यश नेहमी हुलकावणी देत होते, पण आई-वडील आणि बहिणीच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी पुन्हा उभा राहिलो,” अशा भावना प्रवीणने सत्कारप्रसंगी व्यक्त केल्या.
प्रवीण यांनी हार न मानता आपला अभ्यास सुरूच ठेवला. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी पूर्व परीक्षा दिली, त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये मुख्य परीक्षेत यश मिळवले. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेली ‘स्किल टेस्ट’ यशस्वीपणे पार केल्यानंतर,६ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निवड यादीत त्यांचे नाव झळकले आणि त्यांची ‘कर सहाय्यक’ पदी निवड झाली.प्रवीण शेळके यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारे आहे. कोणत्याही मोठ्या संकटावर जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मात करता येते, हेच प्रवीणने सिद्ध केले आहे. संभाजीनगर मित्र मंडळाने त्यांच्या या यशाची दखल घेऊन केलेला सत्कार इतर तरुणांनाही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येण्यासाठी बळ देणारा ठरेल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.




