Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपुणेसौ. परिघा विश्वास आरोटे यांना ‘आरंभ पर्व नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान!

सौ. परिघा विश्वास आरोटे यांना ‘आरंभ पर्व नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान!



सहकार, सामाजिक कार्य आणि पत्रकारितेत नेतृत्वाचा ठसा


महापौर मंजुषाताई नागपुरे, तृप्तीताई देसाईंसह मान्यवरांची उपस्थिती; सौ. परिघा विश्वास आरोटे यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव

पुणे : सहकार क्षेत्रातील नेतृत्व, संस्थात्मक व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्रातील योगदान अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सौ. परिघा विश्वास आरोटे यांना ‘आरंभ पर्व राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दैनिक आरंभ पर्वच्या वतीने, यशस्विनी विकास प्रतिष्ठान, पुणे आणि पुणे प्रहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेण्यात आली.

रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सिल्वर पेटल्स हॉल, धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे येथे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. तृप्तीताई देसाई आणि यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ. सुनिता डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अभिनेत्री मोनालीसा बागल, अभिनेत्री, मॉडेल व निवेदिका मयुरी नव्हाते, अभिनेत्री स्नेहा बालपांडे आणि अभिनेत्री सुप्रिया धोत्रे यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

दैनिक आरंभ पर्वच्या संस्थापिका तथा संपादिका मा. सौ. सुरेखा मते, व्यवस्थापकीय संपादक मा. श्री. प्रतिक गंगणे, निवासी संपादक मा. श्री. लक्ष्मण साबळे आणि मार्केटिंग हेड मा. श्री. अभिषेक मरगळे यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती.

*विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी*

सौ. परिघा विश्वास आरोटे या महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालिका, चितळवेढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालिका, मुक्ताई मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमन तसेच दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या संचालिका म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सहकार, संस्था व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित त्यांच्या कार्याचा आवाका त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.

विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी सहकार आणि संस्थात्मक कामकाजाच्या क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत नवदुर्गा पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. महिलांनी विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन नेतृत्वाच्या भूमिका समर्थपणे पार पाडाव्यात, या विचारालाही त्यांच्या कार्यातून प्रोत्साहन मिळते.

*३१ कर्तृत्ववान महिलांचा गौरव*

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘आरंभ पर्व राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार २०२६’ या सोहळ्यात सामाजिक कार्य, शिक्षण, पत्रकारिता, आरोग्य, सहकार, उद्योजकता, कला आणि सौंदर्य क्षेत्रातील एकूण ३१ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

महिलांच्या कार्याची दखल घेणे, त्यांच्या योगदानाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजासमोर प्रेरणादायी उदाहरणे ठेवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा नारीशक्तीच्या सन्मानाचा विशेष उपक्रम ठरला.

सौ. परिघा विश्वास आरोटे यांना प्रदान करण्यात आलेला नवदुर्गा पुरस्कार त्यांच्या सहकार, संस्था व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्रातील कार्याचा गौरव करणारा ठरला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments