पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून, पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन पारनेरच्या तहसीलदार गायत्री सैदाणे यांनी केले आहे.
तालुक्यातील गॅस वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पारनेर तहसील कार्यालय, पुरवठा विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार गायत्री सैदाणे, पुरवठा विभाग नायब तहसीलदार प्रवीण वाढई, अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद शाहुराव औटी ( सर ), जिल्हा ग्राहक पंचायत प्रसिध्दी प्रमुख तथा पत्रकार भगवान गायकवाड, तालुका अध्यक्ष शहाजी पांढरे, महिला अध्यक्ष सुनीता पवार, संकेत गॅस एजन्सीचे व्यवस्थापक शिवाजी काळे, गणेश एजन्सीचे व्यवस्थापक अजय पतके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार सैदाणे यांनी स्पष्ट केले की, गॅसची बुकिंग २५ दिवसानंतरच करावी तसेच गरज नसताना अतिरिक्त गॅस सिलिंडरचा साठा करू नये. पारनेर तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींकडे सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. वितरणाचे योग्य नियोजन करण्यात आले असून ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळतील याची खबरदारी घेतली जात आहे. जर कोणीही गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असेल किंवा छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असेल, तर त्यांच्यावर प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच गावोगावी दवंडी तसेच कचरा गाडीच्या स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. गॅस एजन्सी व्यवस्थापकांना हि जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶
शासनाने ठरवून दिलेल्या गॅसच्या किंमतीत गॅसची खरेदी करावी. जास्त किंमत देऊन गॅस खरेदी करू नये असे आवाहन अहिल्यानगर ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य शाहूराव औटी यांनी केले आहे.




