सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; लवकरच पक्षात मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत*
पारनेर | प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा आदिवासी समाजाचे आक्रमक नेते श्री. नितीन संभाजी म्हस्के यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.नितीन म्हस्के हे पारनेर तालुक्यातील आदिवासी ठाकर व भिल्ल समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून परिचित आहेत. आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केली आहेत. तसेच आदिवासी बांधवांना त्यांचे घटनात्मक व शासकीय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.म्हस्के यांच्यासह श्री. डी. आर. थोरात, संदीप शिंदे, रोहित मेमाणे, भापकर काळे, कैलास ठुबे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पारनेर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, आदिवासी समाजात पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत होण्यास चालना मिळणार आहे.*यावेळी सुजित झावरे पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे साहेब यांच्या वतीने बोलताना, नितीन म्हस्के यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना लवकरच शिवसेना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले.*यावेळी आनंदराव शेळके, मारुती रोहोकले, अजय दावभट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




