पारनेर / भगवान गायकवाड,
तालुक्यातील अळकुटी केंद्रांतर्गत येणाऱ्या जि. प. शाळांच्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जि. प. प्राथ.शाळा, रेनवडी येथे मोठ्या उत्साहात आणि खिलाडूवृत्तीने पार पडल्या.
या स्पर्धांमध्ये यजमान रेनवडी शाळेने २२ पैकी तब्बल १७ सामन्यांत प्रथम क्रमांक मिळवत एकतर्फी वर्चस्व गाजवले आणि तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
दि ११ व १२ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धांचे आयोजन अळकुटी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रेनवडी ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी रोख बक्षिसे, आकर्षक ट्रॉफी आणि मेडलची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्नेहभोजनाची उत्तम सोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती, लहान व मोठ्या गटातील सांघिक आणि वैयक्तिक अशा विविध खेळ प्रकारांत अळकुटी केंद्रातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. मात्र, रेनवडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मैदानावर वर्चस्व राखले. एकूण २२ प्रकारच्या खेळांपैकी १७ खेळांत प्रथम क्रमांक पटकावून शाळेने आपला दबदबा निर्माण केला. या यशात क्रीडा शिक्षक सचिन गांगड सर, निलेश कवडे सर यांना गोकुळ व्यवहारे सर व शुभांगी सोनवणे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ पावडे यांच्या अचूक नियोजनामुळे शाळेला हे यश संपादन करता आले.
या क्रीडा महोत्सवासाठी विस्तार अधिकारी जयश्री होरा व केंद्रप्रमुख नारायण बाचकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रप्रमुख बाचकर साहेब म्हणाले की, “ग्रामस्थांची आर्थिक मदत, श्रमदान आणि सातत्यपूर्ण उपस्थिती हीच रेनवडी शाळेच्या यशाची खरी ताकद आहे. या शाळेने आयोजित केलेल्या स्पर्धांचा आदर्श तालुका आणि जिल्हा स्तरावर घेण्यासारखा आहे.” विस्तार अधिकारी होरा मॅडम यांनीही विद्यार्थ्यांच्या खेळाचे कौतुक करत त्यांना पुढील तालुकास्तरीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“रेनवडीची पोरं हुशार” – शब्दांची पूर्तता काही दिवसांपूर्वीच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’ंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी रेनवडी शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी “रेनवडीची पोरं हुशार” असे गौरवोद्गार काढले होते. आज क्रीडा क्षेत्रातील या दैदिप्यमान यशाने विद्यार्थ्यांनी ते शब्द खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले आहेत, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.या यशाबद्दल गावातील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले आहे. आता सर्वांचे लक्ष आगामी तालुकास्तरीय स्पर्धेकडे लागले असून, रेनवडीची मुले तिथेही चमकदार कामगिरी करतील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.




