पारनेर / भगवान गायकवाड,
सरपंचाने गावचा विठ्ठल होऊन, गावातील जनतेचा सर्वांगीण विकास करावा. लोकांची मानसिकता लक्षात घेऊन सरपंचांने वेगवेगळ्या संकल्पना राबवून गावामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, जातीभेद आदीबाबत आदर्श काम उभे करावे असे आवाहन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.
पानोली येथील कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच कॉ. नारायण गायकवाड यांच्या 89 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पेरे पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेबक अण्णासाहेब हजारे, देशातील पहिले जातीमुक्त गाव म्हणून प्रसिद्ध असलेले सौन्दाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भास्कर पेरे पाटील म्हणाले, वैकुंठ्ठला जाण्याचा मार्ग सांगण्यापेक्षा, गावातच वैकुंठ कसे निर्माण करता याबाबत विचार करावा. गावचा भौतिक विकासापेक्षा वैचारिक विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, ज्या माणसांनी गावातच वैकुंठ निर्माण केले असे अण्णा हजारे, पोपट पवार, शरद अरगडे अशा माणसांचा आदर्श घ्यावा असे विचार मांडले.
अण्णा हजारे म्हणाले, आजच्या काळातील सरपंचांनी भास्कर पेरे, शरद अरगडे व नारायण गायकवाड अशा आदर्श सरपंचांचे अनुकरण करून आपापल्या गावचा सर्वांगीण विकास करावा.
सौन्दाळा गावचे सरपंच शरद अरगडे म्हणाले, कम्युनिस्ट विचार हा माणुसकी धर्म वाढवणारा विचार आहे, या विचारमुळेच सौन्दाळा गावात जातमुक्त गाव ही देशातील पाहिली संकल्पना राबविण्यात आली. तसेच गावात वादविवाद होऊ नये म्हणून शिवी दिल्यास पाचशे रुपये दंड करण्याची अनोखी संकल्पना सुरु केली असे सांगितले.
कॉ. नारायण गायकवाड यांनी पानोली गावचे 25 वर्ष सरपंच पदावर असताना गावात केलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन ग्रामस्थांनी त्यांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या हस्ते ग्रामरत्न पुरस्कार देऊन
गौरव केला. यावेळी प्रास्ताविक लेखक गणेश निकम सूत्रसंचालन संतोष खोडदे तर आभार भाऊसाहेब गाजरे यांनी मानले.
🔶🔶🔶🔶🔶🔶
सध्याच्या जातीभेदामुळे कलुशीत झालेल्या वातावरणात माणुसकी धर्म वाढवण्यासाठी कॉ. नारायण गायकवाड पुरोगामी विचार मंचाची स्थापना करून त्यामाध्यमातून समतेचा संदेश देणारे विविध उपक्रम राबविणार असल्याचा संकल्प घेण्यात आला. यावेळी या मंचाच्या फलकाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




