पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विविध रस्ते विकासकामांना आता सुरुवात होणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील नागरी सेवा व सुविधा कामे २०२५-२६ तसेच विशेष रस्ता अनुदान २०२५-२६ अंतर्गत आमदार दाते सर यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या एकूण १ कोटी २० लाख रुपयांच्या पाच विकासकामांचे भूमिपूजन रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता तिरकळ मळा, पारनेर येथे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी दिली.
यामध्ये वार्ड क्रमांक ५ अंतर्गत कान्हुर रोड ते सतीश वैद्य वस्ती रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० लाख रुपये, कान्हुर रस्ता ते भाऊसाहेब पुजारी रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० लाख रुपये आणि संगमेश्वर मंदिर ते पारनेरकर महाराज बाग रस्ता डांबरीकरणासाठी २० लाख रुपये अशा एकूण ६० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. तसेच वार्ड क्रमांक ५ अंतर्गत गोरख औटी ते पुणेवाडी पालखी मार्ग रस्ता काँक्रिटीकरणासाठी ४० लाख रुपये विशेष रस्ता अनुदानातून मंजूर झाले आहेत.
त्याचबरोबर वार्ड क्रमांक २ अंतर्गत वैद्य वस्ती ते कान्हुर रस्ता डांबरीकरणासाठी २० लाख रुपयांचे काम विशेष रस्ता अनुदानातून करण्यात येणार आहे. या विविध रस्त्यांच्या कामांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, दैनंदिन वाहतूक आणि स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीनेही ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.
नगरपंचायत क्षेत्रातील रस्ते, नागरी सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने या कामांकडे पाहिले जात आहे. मंजूर निधीतून संबंधित रस्त्यांचे नियोजित पद्धतीने काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून या कामांचा प्रत्यक्ष शुभारंभ कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपनगराध्यक्ष विजुभाऊ औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू औटी, उपाध्यक्ष सुनील गाडगे, महिला शहराध्यक्षा कविता औटी, नगरसेवक अशोक चेडे, नगरसेवक पै. युवराज पठारे, नगरसेवक भाऊ ठुबे, कांतीलाल ठाणगे, प्रदीप नगरे, माऊली औटी आदी मान्यवरांह महायुतीच्या घटक पक्षांचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करत पारनेर शहरातील नागरिकांनीही पारनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतीहासिक प्रसंगी उपस्थित राहून या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




