पारनेर / भगवान गायकवाड,
बालविवाहमुक्त समाज घडवण्यासाठी गावपातळीवर प्रभावी जनजागृती करणे आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने अहिल्यानगर शहर येथे बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ विषयी विशेष जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत नगर तालुका व शहर भागातील ६५० हून अधिक अंगणवाडी सेविकांनी सहभागी होत बालविवाह रोखण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या प्रेरणेने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन (१०९८), स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, सखी सेंटर आणि महिला सक्षमीकरण विभाग यांनी संयुक्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘उडान’ प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या सीमाकौर जुनी यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सखोल माहिती दिली. त्या म्हणाल्या, “ज्या वयात मुलींच्या हातात पुस्तक हवे, त्या वयात त्यांच्यावर संसाराची जबाबदारी टाकणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण खंडित होऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.” त्यांनी गावपातळीवरील बाल संरक्षण समितीची भूमिका, पालकांचे समुपदेशन आणि गोपनीयरीत्या तक्रार नोंदवण्याच्या पद्धतींबाबत अंगणवाडी सेविकांना आश्वस्त केले.सखी सेंटरच्या समन्वयक शबाना शेख यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडा प्रथा यावर भाष्य करत पीडित महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाचे महत्त्व पटवून देत, संकटग्रस्त बालकांसाठी १०९८ या चाईल्ड हेल्पलाईनचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सीमाकौर जुनी यांनी उपस्थित सर्व मान्यवर व अंगणवाडी सेविकांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ दिली. “आमच्या कार्यक्षेत्रात एकही बालविवाह होऊ देणार नाही,” असा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक म्हेत्रे, नुपूर खंडागळे आणि दोन्ही प्रकल्पांतील पर्यवेक्षिकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पर्यवेक्षिकांनी केले, तर विपला फाउंडेशनचे अशोक चिंदे यांनी आभार मानले.




