पारनेर / भगवान गायकवाड,
एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तीनी योग्य पद्धतीने आहार, उपचार घेतल्यास आरोग्य स्थिती उत्तम रहाते. आपण कोणत्याही गोष्टीची सतत काळजी न करता मानसिक संतुलन योग्य ठेवल्यास शंभर वर्षी जगू शकतो. एआरटी. उपचार पद्धतीमध्ये अनेक नवीन संशोधन आणि औषधे विकसित करून एच. आय. व्ही. संसर्गीताचे जीवन सूकर करण्याचे काम शासनाकडून होत आहे. एच. आय. व्ही. संसर्गीत व्यक्तींमध्ये समायोजन, अडथळे पार करण्याची तयारी, संवाद, आणि शिक्षण याची योग्य सांगड नसेल तर आयुष्याचे नुकसान होवू शकते. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास जीवावर बेतू शकते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीनी जातीपातीच्या आधारावर निवड न करता मनातील भावना ओळखून जोडीदाराची निवड केल्यास जीवन सफल होईल, असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालय ए.आर.टी.विभागाचे प्रमुख व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ यांनी केले.
जागतिक एच. आय. व्ही./एड्स सप्ताहा निम्मित मर्कुरी फिनिक्ष ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग आणि स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाने आयोजित केलेल्या सहजीवनाची ओढ असणाऱ्या एच.आय.व्ही./एडस संसर्गितांसाठी राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा आणि परिसंवाद चर्चा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. देविदास धामणे ( ए. आर.टी. प्रमुख, विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल हॉस्पिटल, विळद) मा. शिवाजी जाधव ( जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग अहमदनगर) मा. प्रशांत येंडे (संचालक, विहान प्रकल्प, अहमदनगर), अॅड श्याम असावा (संचालक, स्नेहाधार प्रकल्प) प्रविण मुत्याल (संचालक, स्नेहालय) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मा. प्रशांत येंडे यांनी महाराष्ट्रातील एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींच्या सद्यस्थिती बाबत माहिती देवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रत्येकाने मनामध्ये भीती न बाळगता आपले जोडीदार योग्य पद्धतीने निवडावा असे आवाहन केले. यावेळी मा. शिवाजी जाधव आणि डॉ. देविदास धामणे यांनीही आपल्या मनोगतात ए.आर.टी. उपचाराबाबत व पुढील उपाययोजना बाबत उपस्थितांना माहिती दिली.
मा. प्रवीण मुत्याल यांनी आपल्या प्रस्ताविकात एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींसांठी स्नेहालय संस्थेमार्फत राबवीत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये मुख्यतः केअरिंग फ्रेडस हॉस्पीटल अँड रीसचँँ सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा – सुविधा व भविष्यकालीन नियोजनाबाबत माहिती दिली. राज्यस्तरीय वधू -वर परिचयात राज्यातील विविध जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त एच.आय.व्ही. संसर्गितांनी आपली नावनोंदणी केली. एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तींसोबत आलेल्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय होती. राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळाव्यात निवड झालेल्या ३ जोडीदारांचा येत्या १५ डिसेंबर २०२५ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रमुख विद्या घोरपडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा गोसावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रुपाली सोयम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या घोरपडे, कावेरी रोह्कले, अमर पाटील, सिद्धार्थ दाभाडे, प्रतीक्षा अम्बोरे, कोमल मोकळे, मंदाकिनी मोकळे, सतीश कांबळे, लक्ष्मी खंदारे, दिपक बुरम, आकाश काळे, मुस्तक पठाण, अजय वाकडे, विशाल कापसे, अशोक अकोलकर, राजेंद्र शिंदे, राहुल लवांडे आणि संदीप खरात आदींनी परिश्रम घेतले.






