पारनेर / भगवान गायकवाड, 
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे निसर्ग होरपळून निघत असताना, मुक्या प्राण्यांच्या तृष्णेचा विचार करून पारनेरमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. पारनेर जवळील सिद्धेश्वरवाडी रोड परिसरातील वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये वन्यजीवांसाठी पाणी सोडण्यात आले. पारनेर तालुका पत्रकार संघाच्या “वन्यजीवांसाठी घोटभर पाणी” या सामाजिक उपक्रमांतर्गत आणि नगरसेवक अशोक चेडे यांच्या संवेदनशील पुढाकारातून हा मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

वातावरणातील उष्णता वाढल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. अशा स्थितीत हरिण, मोर, लांडोर यांसारख्या वन्यजीवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. हीच गरज ओळखून नगरसेवक अशोक चेडे यांच्या आर्थिक सहकार्यातून या पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी बोलताना चेडे म्हणाले की, “वाढत्या तापमानामुळे निसर्गातील पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. अशावेळी केवळ प्रशासनावर विसंबून न राहता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येणे काळाची गरज आहे. येत्या दोन महिन्यांत प्राण्यांना पाणी कमी पडू नये, यासाठी मी वचनबद्ध असून खराब झालेले पाणवठ्यातील लिकेजही तातडीने दुरुस्त करून दिले जातील.”

या प्रसंगी उपस्थित असलेल्या आदर्श शिक्षिका मीरा पुजारी यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या, “या परिसरात हरणांचे मोठे कळप वास्तव्यास आहेत. पाण्यासाठी त्यांची भटकंती थांबणार असल्याने हा उपक्रम खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरेल. पत्रकारांनी केवळ लेखणी न चालवता सामाजिक बांधिलकी जोपासावी, हे या उपक्रमातून सिद्ध झाले आहे.”यावेळी कार्यक्षम नगरसेवक अशोक चेडे,आदर्श शिक्षिका मीरा पुजारी.शिक्षक अजिनाथ ढेरे,सामाजिक कार्यकर्ते किरण सोनवणे, सुनील चौधरी संचालक, सनराईज अकॅडमीच सुनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड,(स्नेहालय संस्था,उडान प्रकल्प) आदींनी मनोगत व्यक्त केले.


🔶🔶🔶🔶🔶🔶
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाने सुरू केलेला हा ‘घोटभर पाण्याचा’ यज्ञ येणाऱ्या काळात इतर संस्थांसाठीही दीपस्तंभ ठरेल.

– सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड.(स्नेहालय संस्था, उडान प्रकल्प)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *