सावरगावच्या चिकणेवाडीतील शेतकऱ्याच्या घरावर संकट; पावसाने हिरावला सुरक्षित निवारा

चिकणेवाडी (सावरगाव) I विशेष प्रतिनिधी, 

सतत कोसळणाऱ्या पावसाने एका शेतकरी कुटुंबाच्या डोक्यावरचे छप्परच संकटात आणले आहे. पारनेर तालुक्यातील सावरगाव येथील चिकणेवाडीमध्ये राहणारे शेतकरी पुंडलिक गोविंद चिकणे यांच्या घराच्या पुढील व मागील बाजूच्या दगडी भिंती अचानक कोसळल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे भिंती पूर्णपणे ढासळल्या. उर्वरित भिंतींनाही मोठे तडे गेल्याने घर कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीव मुठीत धरून जगण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे.

या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. घरात असलेल्या चांगुणाबाई चिकणे व त्यांचा मुलगा त्या क्षणी घराबाहेर असल्यामुळे अनर्थ टळला. मात्र आयुष्यभराच्या कष्टातून उभारलेले घर क्षणात उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक आघात झाला आहे. आता या कुटुंबासमोर सुरक्षित निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

घटनेची माहिती मिळताच टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित तलाठी व महसूल अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करून घेतला आणि शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून त्वरित आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली. तसेच चिकणे कुटुंबाची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना तातडीने घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणीही प्रशासनाकडे केली.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीशेठ बेलकर, सावरगावचे उपसरपंच बाळा चिकणे, माजी सरपंच भानुदास गोविंद आग्रे, नवनाथ गांजे, रमेश घोलप, रवींद्र चौधरी, पांडुरंग जेडगुले, तलाठी भालेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

“निसर्गाच्या एका तडाख्याने गरीब शेतकरी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. अशा संकटग्रस्त कुटुंबाला केवळ पंचनामे नव्हे, तर तातडीची मदत आणि कायमस्वरूपी निवाऱ्याची गरज आहे,” अशी भावना कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर यांनी व्यक्त केली.
🔶🔶🔶🔶🔶🔶
“निसर्गाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला शासनाने केवळ पंचनाम्यापुरते मर्यादित न राहता तातडीने आर्थिक मदत द्यावी. चिकणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना आपत्ती निवारण निधीतून नुकसानभरपाई आणि घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा, यासाठी मी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे.”
— रविंद्र राजदेव
नेते, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *