पारनेर / ता. प्रतिनिधी  

पारनेर तालुक्यात सध्या पडत असलेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हंगामाच्या निर्णायक टप्प्यावर आलेल्या पिकांवर या अनियमित पावसाचा जबरदस्त परिणाम झाला असून अनेक ठिकाणी गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

कांदा, गहू, टोमॅटो, डाळिंब, कलिंगड यांसारखी पिके काढणीच्या अवस्थेत असताना गारांसह पडलेल्या पावसामुळे शेतातच पडून राहिली आहेत. कांद्याच्या पिकाला विशेष फटका बसला असून पाण्यामुळे सड, अंकुर फुटणे व दर्जा खालावणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. गव्हाचे पीक ओलाव्यामुळे आडवे पडून धान्याची गुणवत्ता कमी झाली आहे, तर फळबागांमध्ये डाळिंब व आंब्याच्या फुलांवर व फळांवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी पारनेर तालुक्यातील पाडळी आळे, अळकुटी, रेणवडी, म्हस्केवाडी आदी गावांमध्ये जाऊन या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेल्या नुकसानीची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार दाते सर म्हणाले की, “शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व खर्च करून उभे केलेले पीक गारपीटीसह झालेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीत एकटे सोडले जाणार नाही.”

या पाहणी दौऱ्यात जिल्हा कृषी अधिकक्ष सुधाकर बोराळे, ग्राम महसूल अधिकारी श्रीम. बोटे के. डी., कृषी सहाय्यक गायकवाड, ग्रामविकास अधिकारी आहेर, कृषी अधिकारी कुणाल खोमणे यांच्यासह वसंत थोरात, डॉ. उत्तम थोरात, योगेश थोरात, संग्राम पावडे, रामदास थोरात, भाऊसाहेब डेरे, अशोक डेरे, लक्ष्मण डेरे, खंडू दादा थोरात, खंडू जरारे, बबनराव थोरात साहेब, संजीव येवले सर, दत्तात्रय खामकर, कैलास थोरात, दौलत डेरे, प्रज्योत थोरात, भावेश येवले, स्वराज थोरात, बाबाजी जरारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

जमिनीवर पडलेली पिके आणि उद्ध्वस्त झालेला शेतमाल पाहून ग्रामस्थांनीही आपली व्यथा आमदार दाते सरांच्यासमोर मांडली. अनेक ठिकाणी काढणी ठप्प झाल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीत शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

🔶🔶🔶🔶🔶🔶
शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही माझी जबाबदारी असून मला ह्या जबाबदारीची जाणीव आहेच परंतू या संकटकाळात प्रशासन पूर्णतः सतर्क असल्याचे पाहून आपण सर्वजण सामूहिक प्रयत्नांतून ह्या संकटावर निश्चितपणे मात करू असा मला विश्वास आहे.

– आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *