पारनेर / प्रतिनिधी, 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुपा आणि खडकवाडी येथील आयुष्यमान भारत उपकेंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिने काम केलेल्या अरुण माधव वाढवणे आणि देवजी पांडू मेंगाळ या दोन युवकांना एक रुपयाही मानधन मिळालेले नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेने पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार आणि रमेश साबळे यांनी अरुण वाढवणे याला सोबत घेऊन आज (दि. 29) सकाळी 11 वाजल्यापासून पारनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दालनात ठिय्या आंदोलन पुकारले.

आंदोलनादरम्यान गटविकास अधिकारी दयानंद पवार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अविनाश पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर झालेल्या सविस्तर चर्चेत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या निवडीची यादी पाठवल्याचे सांगितले, परंतु प्रशिक्षणार्थींना मानधन देण्यासाठी ते बांधील नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. यावर पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चौकशी आणि कारवाईची मागणी केली.
अखेरीस, गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले की, अरुण वाढवणे (रुई छत्रपती उपकेंद्र, सुपा) आणि देवजी मेंगाळ (प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकवाडी) यांची निवड शासन निर्णय क्रमांक सकीर्ण 2024 अन्वये झालेली दिसत नसून, याबाबत योग्य चौकशी करून कारवाई केली जाईल. या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
**मनसेचा इशारा: जोपर्यंत मानधन मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच

अविनाश पवार यांनी सांगितले की, लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करून या दोन प्रशिक्षणार्थींना मानधन मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवला जाईल. जोपर्यंत या युवकांना त्यांचे हक्काचे मानधन मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

– अविनाश पवार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *