अहिल्यानगर : प्रतिनिधी,
खासदार नीलेश लंके यांची रेल्वे विषयक विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या राज्यसभा सचिवालयाने ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या संसदीय बुलेटिनमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांची २६ सप्टेंबर पासून पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेत रेल्वे विषयक समितीमध्ये लोकसभा सदस्य म्हणून खासदार लंके यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी सुधीर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून, लोकसभा सदस्यांच्या यादीत खासदार नीलेश ज्ञानदेव लंके यांचे नाव क्रमांक १९ वर आहे.
रेल्वे विषयक संसदीय स्थायी समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील रेल्वेशी संबंधित प्रश्न संसदीय स्तरावर मांडण्यासाठी खासदार लंके यांना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील रेल्वे विकासाच्या प्रलंबित मागण्या, प्रवाशांच्या समस्या, नवीन रेल्वे सुविधा, स्थानकांचा विकास तसेच रेल्वे सेवांच्या विस्ताराशी संबंधित विषय या माध्यमातून पुढे नेता येणार आहेत.
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील रेल्वे विकासाशी संबंधित विविध प्रश्नांकडेही समितीच्या माध्यमातून लक्ष वेधता येणार आहे. प्रवाशांच्या सुविधा, प्रलंबित मागण्या आणि रेल्वे विकासाशी संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी या जबाबदारीचा उपयोग केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. खासदार लंके यांच्या या नियुक्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांना संसदीय पातळीवर अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.




