उद्याचा अहिल्यानगरचा हिरो नीलेश लंकेच!

नगरचे राजकीय समीकरण लंके यांच्याभोवती फिरले पाहिजे  

अहिल्यानगर : प्रतिनिधी,

               जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व प्रस्थापित नेते एका बाजूला असताना त्यांना आव्हान देत खासदार नीलेश लंके यांनी मिळविलेला विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून सामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्वक्षमतेचा प्रत्यय आहे. आजच्या राजकारणात नव्या नेतृत्वाला रोखण्यासाठी प्रस्थापित एकत्र येतात; मात्र अशा परिस्थितीत नीलेश लंके यांच्यासारखे नेतृत्व पुढे येत आहे. उद्याच्या राजकीय समीकरणांमध्ये नीलेश लंके यांना विचारल्याशिवाय कोणतेही समीकरण होऊ नये. नगरचे राजकारण लंके यांच्याभोवती फिरले पाहिजे आणि उद्याचा नीलेश लंके हा अहिल्यानगरचा हिरो झाला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाचे जाहीर कौतुक केले.


        यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे व संदीप वर्पे, बाबासाहेब भोस, हर्षदा काकडे, सुधीर म्हस्के, शिव व्याख्याता यशवंत गोसावी, दिलीप सातपुते, योगीराज गाडे, योगिता राजळे, अर्चना गायकवाड, पंडित कांबळे यांच्यासह पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

           अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नीलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा सामाजिक संघटना यांच्या वतीने अहिल्यानगर येथील सहकार सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून लंके यांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीचा गौरव करत त्यांना जिल्ह्याच्या भविष्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू बनविण्याचे आवाहन केले.

            शिंदे म्हणाले, सहकार आपल्या ताब्यात राहावा यासाठी ज्या प्रकारे बोली लावली जाते, ते आकडे ऐकल्यानंतर सामान्य माणूस ही निवडणूक जिंकू शकतो का, असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत पारनेरच्या मतदारांनी एका सामान्य कार्यकर्त्याला नीलेश लंके यांच्या रूपाने जिल्ह्याच्या नव्हे, तर राज्याच्या नेतृत्वापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या विजयाचा मला विशेष अभिमान वाटतो. राज्यभरातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना आव्हान देऊन निवडून आलेले एकमेव नाव म्हणून नीलेश लंके यांची चर्चा झाली. अनेक मातब्बर नेत्यांच्या जिल्ह्यात सामान्य घरातील मुलगा आमदार होतो, खासदार होतो आणि प्रस्थापितांना आव्हान देतो, ही साधी गोष्ट नाही. नीलेश लंके हे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. लहान कामांतून स्वतःची धमक दाखविणारे नेते असतात, त्यामध्ये लंके यांचा समावेश होतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

           आजच्या राजकारणात एखादे नवे नेतृत्व उभे राहत असेल तर त्याला रोखण्यासाठी अनेकजण एकत्र येतात. हे नेतृत्व मोठे झाले तर भविष्यात आपल्याला आव्हान निर्माण होईल, या भीतीने पक्ष आणि विचार बाजूला ठेवूनही लोक एकत्र येतात. मात्र, अशा परिस्थितीतच सामान्य जनतेतून नवे नेतृत्व पुढे येत असते. अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार, शिक्षण आणि कारखानदारीच्या माध्यमातून अनेक नेते तयार झाले. त्यांनी जिल्ह्यासाठी योगदान दिले आहे. त्यांचा अनादर करण्याचा प्रश्न नाही. परंतु आज सामान्य माणसासाठी कोण उभे राहणार, हा प्रश्न निर्माण झाला असताना पारनेरचे मतदार अभिमानाने नीलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे या नेतृत्वाला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे शिंदे म्हणाले.

             नीलेश लंके यांनी आमदारकीची मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा देऊन खासदारकीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनात प्रस्थापितांना पराभूत करण्याची जिद्द होती. अन्याय झाला की त्याविरोधात मैदानात उतरायचे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांच्या कार्यातून दिसते. लंके हे केवळ राजकारणी नाहीत, तर मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, करामती व्यक्तिमत्त्व आणि कलाकारही आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले.

            खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमा राबविल्या जातात. या मोहिमांमध्ये सहभागी होताना त्यांच्या कामातील गनिमी कावा अनेकदा लक्षात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून इतिहास घडविला. त्याच पद्धतीने लंके यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांची मते फोडत २४ मतांनी विजय मिळविला. त्यांची लोकप्रियता ही सहजासहजी मिळणारी नाही. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही घेतली होती, असे शिंदे म्हणाले.

              राजकारणात चांगली माणसे दुर्मीळ झाली आहेत. अशा परिस्थितीत गरीब, तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी लढणारे नेतृत्व उभे राहिले तर त्याला चालना देणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक हे त्यासाठी निमित्त ठरले आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये लंके यांना जनतेची साथ मिळाली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व मोठे झाले आहे. पारनेर सोसायटीच्या मतदारांनी जशी साथ दिली, तशीच साथ जिल्ह्यातील इतरांनीही द्यावी. भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये एका व्यक्तीला विचारल्याशिवाय कोणतेही समीकरण पूर्ण होऊ नये आणि ते नाव नीलेश लंके असावे, अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. नगरचे राजकारण लंके यांच्याभोवती फिरले पाहिजे. उद्याचा नीलेश लंके हा अहिल्यानगरचा हिरो झाला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

            सत्कार समारंभापूर्वी प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे, खासदार नीलेश लंके आणि पदाधिकाऱ्यांनी जेऊर येथे जाऊन दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या बांधावरच शिंदे, लंके आणि पदाधिकाऱ्यांनी वनभोजन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व म्हणून लंके यांच्या कार्याचा उल्लेख करत शिंदे यांनी त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीला बळ देण्याचे आवाहन केले.

            जिल्हा बँकेच्या एका जागेवरील विजयाच्या निमित्ताने शशीकांत शिंदे यांनी खासदार नीलेश लंके यांना केवळ विजयी संचालक म्हणून नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणातील संभाव्य केंद्रबिंदू म्हणून पुढे आणण्याची भूमिका मांडली. त्यामुळे हा सत्कार सोहळा लंके यांच्या राजकीय नेतृत्वाच्या नव्या पर्वाची नांदी ठरणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
सहकार सभागृह हाऊस फुल्ल ! 
        या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमास उशीर होऊनही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. सकाळी ११ वाजताच सहकार सभागृह खाखाखच भरले होते. बाहेर शेकडो कार्यकर्ते उभे असल्याने ऐनवेळी बाहेर स्क्रीन लाऊन बाहेरच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम पहावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *