पारनेर दि.१२ पारनेर प्रतिनिधी
पारनेर शहरातील कान्हुर पठार रस्त्यालगत असलेल्या मनकर्णिका लॉन येथे पारनेर शहरातील औटी आणि बुगेवाडी येथील चतर या दोन्ही कुटुंबांचा वधू आणि वर यांचा शुभविवाह संपन्न झाला. या शुभविवाहात उपस्थित पुढाऱ्यांच्या शुभेच्छाना फाटा देऊन ज्येष्ठ कीर्तनकार सोपान काका ( महाराज ) औटी यांची एकच शुभेच्छा घेऊन वेळेत विवाह सोहळा संपन्न करून मराठा समाजाने केलेल्या विवाह आचारसंहितेला प्रतिसाद देत आणि समाजापुढे साधेपणाने शुभविवाह पार पाडला आहे. या विवाहातून मराठा समाजाला आदर्श निर्माण झाला आहे.
मराठा समाजाने हुंडा मागणी, लग्न खर्च कमी करणे आणि साधेपणा यावर भर देणारी विवाह आचारसंहिता तयार केली आहे. या आचार संहिता मध्ये हुंडा मागणी पूर्णपणे बंद करणे, महिलांवरील छळ प्रतिबंध, आणि विवाह सोहळ्यातील खर्च कमी करण्याचा नियम करण्यात आला आहे.
मराठा समाजाने हुंडा मागणीला विरोध दर्शविला आहे. आणि हुंडा देणाऱ्या घेणाऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर महिलांवरील छळाला विरोध दर्शवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लग्नात अनावश्यक खर्च टाळण्यासाठी साधेपणा आणि खर्च नियंत्रण यावर भर दिला आहे. तसेच सामुदायिक विवाह सोहळा करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. प्री. वेडिंग शूट टाळण्याचा निर्णय घेतला आहे. तर कर्णकर्कश डिजे आणि फटाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शंभर ते दोनशे लोकांमध्ये विवाह करण्याचा नियम केला आहे. विवाह सोहळा मध्ये पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांचा वापर करावा या प्रकारची नियमावली मराठा समाजाने केली आहे. या प्रमाणे विवाह सोहळा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.




